कल्याण: इलेक्ट्रिक दुकानात काम करणा-या सुनिल मौर्य याने आपल्या मित्रांच्या मदतीने दुकान मालक सचिन म्हामाणे यांचा निर्घृण खून करून त्यांचा मृतदेह जमिनीत पुरल्याचे गेल्या आठवड्यात टिटवाळा नजीकच्या दहागाव परिसरात उघडकीस आले होते. दरम्यान या गुन्हयात मृत सचिन यांची पत्नी नंदा हिचा सहभाग असल्याचे तसेच तीने अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पती सचिनचा प्रियकर सुनिलच्या मदतीने काटा काढल्याचे कल्याण तालुका पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अटक केलेल्या नंदाला आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता तीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
खूनप्रकरणात सुनील मौर्या या नोकरासह त्याचे साथीदार शुभम गुप्ता, अभिषेक मिश्रा यांना पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत. तिघांनी सचिनचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह जमिनीत पुरला होता. कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्यावर मेलेल्या म्हशीच्या मृतदेहाचे अवशेष टाकले होते. दुकानात काम करणारा सुनिल आणि पत्नी नंदा हिचे अनैतिक संबंध असल्याची कुणकुण सचिन यांना लागली होती. यावरून सचिन यांचे नंदाशी वारंवार भांडण देखील व्हायचे. या भांडणाबाबत तसेच सचिन देत असलेल्या त्रासाबाबत नंदा सुनिलला सांगायची. सचिन सुनिलला कामावरून काढून देखील टाकणार होता.
तशी तो वारंवार धमकी देखील दयायचा. त्यामुळे सुनील संतापला होता. अखेर सुनीलने सचिन यांचा काटा काढायचा ठरवले. खूनाचा कट रचताना नंदाची त्याला साथ लाभली आणि खून करताना त्याने मित्र शुभम आणि अभिषेकची मदत घेतल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी दिली. ज्या स्कार्फने गळा आवळून सचिनचा खून केला तो स्कार्फ नंदानेच सुनिलला सचिनचा खून करण्यासाठी दिला होता. खूनाच्या आधीही अपघात करून सचिनला जीवे मारण्याचा डाव सुनिल आणि नंदाने आखला होता. पण तो यशस्वी झाला नव्हता.