डोंबिवली : पूर्वेतील दत्तनगर चौकात उभारलेल्या १५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि ३० बाय २० फूट आकाराच्या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण मंगळवारी प्रजासत्ताकदिनी करण्यात आले. या सोहळ्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत, याचा वेगळाच आनंद, अभिमान आहे. त्याची नोंद इतिहासात होणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.
प्रभाग ७६ व ७७चे माजी नगरसेवक राजेश आणि माजी नगरसेविका भारती मोरे यांनी हा ध्वजस्तंभ उभारला आहे. शहराच्या सांस्कृतिक नगरीत आणखी एक मानाचा तुरा खोवल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू होती. या सोहळ्यानिमित्त २५ जानेवारीपासून दत्तनगर चौक व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ती पाहण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केली.ध्वजस्तंभ उभारण्याचे काम केडीएमसीच्या उपअभियंत्या रोहिणी लोकरे, आर्किटेक राजीव तायशेटे, महावितरण अधिकारी व कर्मचारी आदींच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले. राष्ट्रध्वजाच्या शेजारीच राष्ट्रपुरुषांची अत्यंत सुंदर अशी शिल्पही पूर्वीप्रमाणेच साकारली आहेत. प्रत्येक डोंबिवलीकरांच्या मनातील जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना आणखीन बळकट होण्याच्या उद्देशाने आपण ही राष्ट्रध्वजाची संकल्पना मांडल्याचेही मोरे यांनी सांगितले.
नियम पाळून जल्लोष करा- सूर्यवंशीडोंबिवली ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असल्याचा प्रत्यय या कार्यक्रमादरम्यान आला. तरुणाईचा जल्लोष, चैतन्य, जोश येथे पाहायला मिळाला. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर अजून काही दिवस काळजी घ्यावी. नियम पाळून जल्लोष व्यक्त करावा, असे आवाहन केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.