मुरलीधर भवार, कल्याण: "मी वाटच बघतो. माजी खासदार कपिल पाटील यांनी मला नोटीस पाठवावी. त्यांच्या विरोधात मी दहा शासकीय नोटीशा पाठविणार," असे खुले आव्हान भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी माजी खासदार पाटील यांना दिले आहे. टी राजा यांच्या कार्यक्रम आयोजनावरुन आजी माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
माजी खासदार पाटील यांच्या फाऊंडेशनच्या वतीने तेलंगणाचे आमदार टी. राजा यांचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास खासदार बाळ्या मामा यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र आमदार राजा यांच्या विरोधात १०८ गुन्हे दाखल आहे. त्यापैकी १८ गुन्हे हे जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करुन द्वेष पसरविल्याचे आहेत. त्यामुळे राजा यांना विरोध केला होता.
या विरोधापश्चात माजी खासदार पाटील यांनी बाळ्या मामांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करीत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. काल विविध कार्यक्रमानिमित्त खासदार बाळया मामा हे कल्याण पश्चिमेत आले होते.
यावेळी पत्रकारांनी खासदार बाळया मामा यांना माजी खासदार पाटील यांनी केलेल्या वक्तव्याविषयी छेडले असता बाळ्या मामा यांनी सांगितले की, बरी ईदला दोन दिवस बाकीअसताना हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी गेल्या दहा वर्षात अशा स्वरुपाचा कार्यक्रम का आयोजित केला नाही ? असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे माजी खासदारांनी माझ्या बुद्धीची किव करण्यापेक्षा त्यांची बुद्दी तपासून घ्यावी असा सल्ला दिला आहे. भाजपच्या एका खासदाराने संविधान बदलण्यासठी ४०० पारचा नारा दिला होता. त्या पश्चात टी. राजा यानीही हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी हा नारा असल्याचे वक्तव्य केले होते असे बाळ्या मामा यांनी सांगितले. त्यामुळे बाळया मामांनी दिलेल्या खुल्या आव्हानाला माजी खारदार काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.