कल्याण-डोंबिवलीनजीक संदप भोपर येथील खदाणीत पाणी टंचाईमुळे पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास व पालकमंत्र्यांकडे वारंवार मागणी बैठकीची मागणी केली. मात्र आज बोलाविण्यात आलेल्या पाण्याच्या बैठकीस मला बोलविले नाही, यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“मी मागणी करुन मला वेळ दिली नाही. बैठकही बोलाविली नाही. खासदारांनी मागणी करताच बैठक आयोजित केली. बैठक आज आयोजित केल्याची माहिती मला काल कळली. त्यासाठी नगरविकास खात्याच्या सचिव प्रतिभा पाटील यांच्याकडे मी विचारणा केली असता त्यांनी मला बोलविले नसल्याचे सांगितले. मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. मलाच डावलण्यात आले आहे. मला साधे सूचित देखील केले गेले नाही. पालकमंत्र्यांकडून पाणी प्रश्न सुटला तर मला आनंदच आहे. प्रश्न सोडवितील अशी मला आपेक्षा आहे,” असे राजू पाटील यांनी सांगितले.
२७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठीची उपाययोजना तात्पुरती आहे. बड्या गृहसंकुलांना पाणी दिले जाते. त्यांना पाणी देण्यास माझा विरोध नाही. पण आमच्या टंचाईग्रस्त गावांना पाणी कोण देणार असा प्रश्न महापालिका प्रशासनाकडे आहे. दिव्यात ठाणे महापालिकेकडून २०० कोटी रुपयांची पाणी योजना राबविली जात आहे. दिव्यात पाणी कोटा आहे. पण योजना राबविणाऱ्या ठेकेदाराचे ७० कोटींचे ड्यू आहेत. २०० कोटी खर्च करण्यापेक्षा केंद्र सरकारची अमृत योजना राबविली पाहिजे होती याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.
कल्याण डोंबिवलीत नालेसफाईचा बोजवारा उडाला आहे. पहिल्या पावसात अनेक भागात पाणी साचले. महापालिकेचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यामुळे यावेळी नालेसफाईचा पाहणी दौरा मी केलाच नाही. महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून त्यांच्याच धुंदीत आहेत. त्यांना डोंबिवली शहराची पूर्ण माहितीही नसेल. स्मार्ट सिटी अंतर्गत केवळ कल्याण पश्चिमेतील स्टेशन परीसराचा विकास केला जात आहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवलीचा त्यात समावेश नसल्याचा मुद्दाही आमदार पाटील यांनी उपस्थित केला.