कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माझ्या लोकसभा मतदारसंघाची काळजी करू नका, मी कल्याण लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आणि पुन्हा मताधिक्याने निवडून येणार, असे आव्हान विरोधकांना दिले आहे. खोणी आणि शिरढोण म्हाडा रहिवासी महासंघातर्फे म्हाडाची घरे मिळवून देण्यात खासदार शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार मंगळवारी झाला. या कार्यक्रमात खासदार शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार, असे लिहिलेला केक कापला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात पाटील हे मनसेचे लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. खासदार शिंदे यांनी मनसे आमदारांचा नामोल्लेख न करता टीका केली. खासदार शिंदे म्हणाले की, लोकांना टीका करण्याची सवय आहे. पाच वर्षे लोकांनी त्यांना जबाबदारी दिली; पण त्यांनी काही काम केले नाही. स्वप्न पाहणे वाईट नाही, मात्र आजीच्या पुढे माजी लागता कामा नये, असेही खासदार शिंदे म्हणाले.
‘जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ घेतील’
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभा असेल त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतो. याठिकाणी शिवसेना-भाजपची युती आहे. युतीवर विश्वास ठेवणारा या ठिकाणचा मतदार आहे. शिवसेनेला आणि भाजपला किती जागा मिळणार, याबाबत दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय योग्य वेळी घेतील, असे खासदार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पाच वर्षांत त्यांनी ऑफिसही उघडले नाही
लोकांचे प्रेम हे कामातून मिळते. ते कुठूनही विकत घेता येत नाही. तसेच ट्विटरवर लिहून मिळत नाही. चांगली कामे होत असलीत, तर त्यामध्ये खो घालतात. पाच वर्षांत त्यांनी ऑफिसही उघडले नाही. लोकांना माहितीच नाही कुठे जायचे. मी कामातून बाेलतो. वायफळ बडबड करीत नाही, असेही खासदार शिंदे म्हणाले.