कल्याण - मनसेने शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर मनसेला मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. याबाबत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना पत्रकारांनी विचारलं असता, मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल असं सांगत मंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. महासंपर्क विद्यार्थी संवाद अभियान अंतर्गत अमित ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी अनऔपचारिकरित्या बोलताना त्यांनी संघटनात्मक काही बदल देखील केले जातील असं म्हटलं आहे.
अमित ठाकरे यांनी या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतोय त्यांच्या अडचणी जाणून घेतोय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य सोपं करण्यासाठी मनसे प्रयत्न करणार असं सांगितलं आहे. मात्र यावेळी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेने भाजपला मतदान केल्यामुळे आता नव्या शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मनसेला खाते मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात होते.
अमित ठाकरे मात्र राज्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर लोकांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) राज्यातील सत्तासंघर्षापासून बरीच दूर आहे. अध्यक्ष राज ठाकरे देखील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. तेही अजून फारसे काही बोलले नाहीत आणि सक्रिय देखील झालेले नाहीत. पण आपल्या पक्षाची बांधणी करण्याची धुरा अमित ठाकरेंनी घेतलेली दिसत आहे. अमित ठाकरे यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकलने प्रवास केला. त्यानंतर अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अंबरनाथ पूर्वेतील रोटरी सभागृह येथे विद्यार्थी तसेच पदाधिकारी यांच्याशी बंददाराआड त्यांनी संवाद साधला.
पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मनसेला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारला. गृहमंत्री पद देणार असतील तर नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी होऊ, पण ते देत नाहीत ना, असा मिश्किल टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला. यावेळी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत, वर्षानुवर्षे असलेल्या त्या कायम असल्याची नाराजी व्यक्त केली. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे या भावांनी महाराष्ट्रात संवाद दौरे सुरू केले आहेत.