लोकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ: भाजप पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास आपण मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू, असे माजी खासदार कपिल पाटील यांनी रविवारी सांगितले. मात्र, विद्यमान आमदार किसन कथोरे यांनाच उमेदवारी मिळाली तर त्यांच्यासाठी काम करण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार पाटील आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कथोरे हे दोघेही भाजपमध्येच असले, तरी त्यांच्यातील वितुष्ट जगजाहीर आहे. लोकसभा निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी जाहीरपणे कथोरे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला होता. पक्षाने आदेश दिल्यास मुरबाड विधानसभेतून निवडणूक नक्की लढणार, अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे.
वामन म्हात्रे, सुभाष पवार स्पर्धेत
बदलापूरचे शिंदेसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि मुरबाडमधील शिंदेसेनेचे सुभाष पवार यांनीदेखील आगामी विधानसभेकरिता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एवढेच नव्हे, तर कथोरे यांना अडचणीत आणण्यासाठी सुभाष पवार यांच्या माध्यमातून खेळी खेळली जात असल्याचे म्हटले जाते.