कल्याण-नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगिकारली तर शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही, स्वच्छता ही एक सवय आहे, ती सवय प्रत्येक नागरिकाने लावून घेतली तर चळवळ निर्माण होईल आणि या चळवळीतूनच शहर स्वच्छ होईल असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज येथे केले.
स्वच्छ अमृत महोत्सवाअंतर्गत इंडियन स्वच्छता लिग हा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ महापालिकेमार्फत साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने आज सकाळी महापालिका मुख्यालयात आयोजित केलेल्या महापालिका अधिकारी कर्मचारी , शिक्षक वर्ग, विद्यार्थी, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्या भव्य रॅलीस संबोधताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी महापालिकेच्या या उपक्रमाचे टिम कॅप्टन ब्रँड अँम्बॅसिडर डॉ. प्रशांत पाटील, आयएमए चे डॉ. अश्विन कक्कर, घनकचरा विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, उप आयुक्त विनय कुलकर्णी, इतर अधिकारी /कर्मचारी आणि महापालिका क्षेत्रातील महाविद्यालये व शाळांतील सुमारे ८०० ते ८५० विद्यार्थी उपस्थित होते. यासमयी उपस्थित अधिकारी /कर्मचारी व शिक्षक, विद्यार्थी वर्ग यांनी स्वच्छतेविषयी शपथ घेतली.
महापालिकेतून निघालेली ही भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, आग्रा रोड, सहजानंद चौक मार्गे दुर्गाडी किल्ला ते गणेश घाटापर्यंत काढण्यात आली. याठिकाणी उपस्थितांमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच गणेश घाट येथे उप आयुक्त अतुल पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गास ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक कचरा, सॅनीटरी कचरा याचे विलगीकरण कसे करावे, त्यामुळे शहर स्वच्छ होण्यास कशी मदत होईल याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले आणि तद्नंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील स्वंयस्फुर्तीने कचरा विलगीकरण, स्वच्छतेचे महत्व याविषयी आपले मत मांडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ घराघरात पोहचेल याचे प्रत्यंतर आले.