कल्याण- कोरोना काळात सगळ्यांनाच आर्थिक फटका बसला आहे. त्यात फेरीवालेही आहेत. दिवाळीनंतर कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविले नाहीत. तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्तांची आज भेट घेतली. भाजप आमदारानंतर मनसेच्या आमदारांनी आयुक्तांची भेट घेऊन विविध नागरी प्रश्न सोडविण्याची मागणी केली. दिवाळीनंतर ऑपरेशन फेरीवाला हटाव प्रशासनाकडून करण्यात आले नाही. तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे आमदारांनी आयुक्तांना बजावले आहे.
२७ गावातील अनेक भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. २७ गावासाठीच्या अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी टाक्या बांधण्याचा विषय पेंडिंग आहे. २७ गावातील पाणी टंचाई ग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा. रस्ते प्रकल्पात आणि रिंग रोड प्रकल्पात आटाली आंबिवली परिसरातील बाधितांना बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्यात यावी. लोकग्रामचा पादचारी पूलाकरीता टेंडर आले होते. मात्र पुन्हा फेर निविदा काढली आहे. २७ गावातील ग्रामपंचायती असताना त्यांच्याकडून विकासापोटी सरकारला कोट्यावधी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले होते. वसूल केलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुलनेत त्या गावांमध्ये अत्यंत कमी खर्चाची विकासकामे केली आहेत. रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या विविध मुद्यांकडे आयुक्तांचे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. निवडणूका आल्या की, शिवसेनेकडून बॅनरबाजी केली जाते. कोट्यवधी रुपये मंजूर केल्याचे बॅनर लावले जातात. प्रत्यक्षात लावलेले बॅनर फाटायला आले तरी कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याची टिका आमदार पाटील यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काल कल्याणमध्ये आले होते. त्यांनी कल्याण डोंबिवलीतील खराब रस्त्याला तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. त्यावर आमदार पाटील यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारमध्ये केवळ भाजप नव्हती. तर शिवसेनाही होती. युतीचे सरकार होते. त्यामुळे जयंतरावांनी हा प्रश्न शिवसेनेलाही विचारला पाहिजे याकडे लक्ष वेधले आहे.