कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात फेरीवाले बसले तर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ठोकून काढू, असा सज्जड इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवाॅकवर मराठी तरुणाला तुम्ही मराठी लोक असेच असता, असे म्हणून परप्रांतीय फेरीवाल्यांनी मारहाण केली. या तरुणाच्या मदतीला मनसे कार्यकर्ते धावले. त्यांनी फेरीवाल्यांना चांगलाच चोप दिला. या प्रकरणात महात्मा फुले पोलिस ठाण्यात मराठी तरुणासह मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर फेरीवाल्यांच्या विरोधात केवळ एनसी दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा जाब विचारण्यासाठी बुधवारी मनसे आमदार पाटील यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांची भेट घेतली. पोलिसांनी असा कसा गुन्हा दाखल केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, चेतना रामचंद्रन, योगेश गव्हाने, विनोद केणे आदी उपस्थित होते.
प्रशासनाला कारवाईचे आदेश त्वरित देण्याचे आश्वासन
फेरीवाला हा प्रश्न महापालिकेशी संबंधित आहे. तसेच रेल्वेचा काही भाग हा रेल्वे पोलिसांच्या हद्दीत असल्याने या दोन्ही प्रशासनाला महात्मा फुले पोलिस ठाण्याकडून आजच पत्र दिले जाईल. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेत कारवाई करण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलिस निरीक्षक होनमाने यांनी आमदार पाटील यांना दिले आहे.
‘केडीएमसीला भीक लागली असेल, तर भीक मागून पैसे देऊ’
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात आणि स्टेशन परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्यांचा काही उपयोग होतो की नाही, असा सवालही आमदार राजू पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. केडीएमसीला भीक लागली असेल तर आम्ही चार दिवस स्टेशनच्या बाहेर बसून भीक मागून त्यातून आलेले पैसे केडीएमसीला देऊ, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.