कल्याण- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी एक पत्र मनसेला पाठवून ज्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर मनसेने केलेल्या आंदोलवर भाष्य केले आहे. कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि राज्याच्या मालमत्तेची तोडफोड करुन नुकसान करतो ? असा संतप्त सवाल उपस्थित केला होता.
मंत्री चव्हाण यांच्या खरमरी पत्राला मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करुन उत्तर दिले आहे. जर तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपलेत तर आमच्यावर दगड भिरकावण्याची वेळच आली नसती. कोकण महामार्गावर अपघातात गेलेले बळी पाहता. कोकणातील दगडालाही पाझर फुटेल. पण गेली अनेक वर्षे सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभीमान का जागा झाला नाही ? अशी खोचक टिका केली आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षा पासून सुरु आहे. आत्तापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाले आहे. परंतू हा रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याची पाहणी खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यानी केली. त्यानंतर याच रस्त्यावरुन त्यांनी सत्ताधारी पक्षाला टिकेचे लक्ष केले. राज ठाकरे यांच्या टिकेपश्चात मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली. या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी एका पत्राद्वारे मनसेला उपरोधिक चिमटा काढला. त्यांच्या पत्राला मनसे आमदार पाटील यांनी प्रतिउत्तर दिले.