अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणी महायुतीमधील नाराजी नाट्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाईचे ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या आमदार, नगरसेवकाच्या मतदारसंघात मतांचा टक्का घसरेल त्याचा उमेदवारीचा पत्ता कापला जाईल, अशी तंबी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध ठिकाणच्या बैठकांत दिली.
कल्याण, पालघर, भिवंडी, रायगड आदींसह राज्यात विविध लोकसभा मतदारसंघात शिंदेसेना अथवा अजित पवार गटाला उमेदवारी मिळाल्याने किंवा त्यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे बावनकुळे यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी आमदार व नगरसेवकांच्या बैठका घेऊन कुणाचीही नाराजी, मतभेद असतील तर ते तातडीने मिटवावेत. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाला पाहिजे, असे आदेश दिले. लोकसभेची प्रत्येक जागा पक्षासाठी महत्त्वाची असल्याने कुणाच्याही नाराजीचा निकालावर परिणाम होऊ नये. तसे होणे हे पक्षाला अपेक्षित नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
डिसेंबर, जानेवारीमध्ये विधानसभानिहाय दौरा करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम झाले आहे की नाही? ६०० जणांना बूथ रचनेत आणले की नाही, रोज दहा जणांना पक्षाशी जोडले की नाही हे सगळे मतदान किती झाले, यावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणी सुटणार नाही, सूक्ष्म पातळीवर पाहणी सुरू असून वरिष्ठ स्तरावर सगळी माहिती घेतली जात आहे. जे कोणी उमेदवार असतील ते महायुतीचे उमेदवार आहेत, ते घटक पक्षांचे नाहीत हे सगळ्यांनी लक्षात घेऊन कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार, नगरसेवकांचा स्कोअरबोर्ड - भाजप आमदारांनी लोकसभेच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून द्यावे. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी बूथ रचना भक्कम करावी, त्यांचा स्कोअर बोर्ड बूथवर किती मतदान झाले यावरून ठरवण्यात येईल.- कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी काही दिवसांपूर्वी झालेल्या झूम मीटिंगला कल्याण पूर्वेतील काही पदाधिकारी हजर नव्हते. त्याची गंभीर दखल बावनकुळे यांनी घेताच अवघ्या ४८ तासांत कल्याण लोकसभेमधील सर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवली गेली.