कल्याण- कल्याण पूर्वेतील नांदीवली परिसरात २७ एकर गुरचरण जागेवर अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. तहसीलदारांना वारंवार माहिती देऊन देखील काही एक कारवाई होत नाही. तहसीलदारांवर कोणाचा तरी दबाव असल्याने ही कारवाई होत नाही. सर्व प्रकार थांबले तर कल्याण पूर्वेचा विकास होणार असे धक्कादायक विधान भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे.
भाजप आमदार गायकवाड हे कल्याण पूर्वेत विकासाबद्दल सातत्याने विधान करीत आहेत. आमदार गायकवाड यानी कल्याण पूर्वेचा विकास का झाला नाही. कशा प्रकारे त्यांची कामे रोखली गेली आहेत. हे जाहिर कार्यक्रमात काल बोलून दाखविले आहे. कल्याण पूर्वेतील गणेश टेकडी परिसरात एका मंदिराच्या कामासाठी आलेल्या निधीतून मंदिराचे काम होणार आहे. त्या कामाचे भूमीपूजन आमदारांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमात पूुन्हा एकदा गायकवाड यांनी सांगितले की, सर्व नेत्यांनी विकास कामाना पाठिंबा दिला पाहिजे. मी निधी मजूर करुन आलेली विकास कामे जाणीवपूर्वक थांबविली गेली आहेत. मी निवडून आल्यापासून अनेक आरक्षित भूखंड बेकायदा बांधकाम होण्यापासून वाचविले आहेत असे आमदार गायकवाड यांनी सांगितले. तसेच त्यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. नांदिवली परिसरातील २७ एकर गुरचरण जागा आहे. ती समाजाच्या कामासाठी आली असती. मात्र जागेवर अधिकृत बांधकाम सुरु आहे. या प्रकरणी तहसीलदारांना माहिती दिली आहे. वारंवार सांगून देखील तहसीलदारांकडून काही एक कारवाई केली जात नाही. तहसीलदारांवर कोणाचा तरी दबाव आहे. त्यामुळे ती अनधिक़त बांधकामे थांबत नाहीत. याची खंत मला वाटते. या गोष्टीत कुठल्या तरी लोकाचे वर्चस्व असणे आणि त्यांच्यावर दबाव तंत्र असणे चुकीचे आहे. ती अनधिकृत बांधकामे थांबली पाहिजे. तर कल्याण पूर्वेचा विकास होऊ शकतो.
दरम्यान आमदार गायकवाड यांनी केलेल्या आरोपासंदर्भात कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही या जागेचे सर्वेक्षण केले आहे. आठ दिवसात कारवाई होणार आहे.