उल्हासनगर : कॅम्प नं-२, टेलिफिन एक्सचेंज जवळील महापालिका उद्यानाच्या विकासासाठी आमदार कुमार आयलानी यांनी निधी दिल्यावर, उद्यानात बेकायदा दुकाने बांधण्यात आल्याचे उघड झाले. प्रभाग अधिकारी अनिल खतूरानी यांनी दुकानदारांना नोटिसा देऊन स्वतःहून बेकायदा बांधकामे न काढण्यास पाडकाम कारवाईचे संकेत दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेने राखीव ७०५ क्रमांकाच्या भूखंडावर कोट्यावधीचा खर्च करून साई वसनाशहा उद्यान बांधले आहे. दरम्यान उद्यान शेजारील दुकानदारांनी उद्यानात अवैधपणे वाढीव बांधकाम करून उद्यानाचा वापर सुरू केला. यामुळे उद्यानात येणाऱ्या वृद्ध, मुले, महिलांच्या सुरक्षितेला धोका निर्माण झाला. यापूर्वी माजी महापौर आशा इदनानी व माजी उपमहापौर जीवन इदनांनी यांनी अवैध बांधकामाबाबत महापालिकेकडे,पाठपुरावा करूनही राजकीय हस्तक्षेपामुळे पाडकाम कारवाई झाली नाही. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी नागरिकांच्या सोयीसाठी उद्यानाची संरक्षण भिंत व नूतनीकरणसाठी आमदार निधी दिला. मात्र उद्यानाचा कब्जा दुकानदारांनी घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले.
उद्यानात विकास कामाचे नामफलक आमदार आयलानी यांनी लावल्यावर, महापालिकेला अवैध बांधकामाची आठवण होऊन, दुकानदारांना एका आठवड्याच्या मुदतीच्या नोटिसा दिल्या आहेत. दुकानदारांनी स्वतःहून बेकायदा बांधकाम काढले नाहीतर, पाडकाम कारवाईचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या उद्यान विकासासाठी दिलेल्या निधीमुळे, उद्यानातील अवैध बांधकामाचा पर्दापाश झाल्याचे बोलले जात आहे. उद्यानातील तब्बल २७ दुकानदारांना २३ ऑक्टोबर रोजी नोटिसा दिल्या आहेत. तसेच स्वतःहून अवैध बांधकामे काढून टाकली नाहीतर, महापालिका पाडकाम कारवाई करण्याचे संकेत सहायक आयुक्त शिंपी यांनी दिल्याने, दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. तसेच आरक्षित ७०५ क्रमांकाच्या महापालिका भूखंडावरून इतर अवैध बांधकामावरही कारवाई करावी. अश्या मागणीने जोर धरला आहे.
उद्यानातील बेकायदा बांधकामे हटवा - कुमार आयलानीमहापालिकेच्या उद्यानात अवैध बांधकामे होऊन, उद्यानाचा वापर त्यांनी सुरू केला. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या वृद्ध, महिला, मुले आदींच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. उद्यानातील दुकांदारांचा वापर बंद करून, त्यांच्या बेकायदा बांधकामावर महापालिकेने पाडकाम कारवाई करावी.