मुरलीधर भवारकल्याण : कोरोनाकाळातील सगळ्य़ात कडक असलेली बंदी अनलॉकमध्ये शिथिल झाली होती. मात्र, पुन्हा नववर्षाच्या आगमनाला लोक बाहेर पडणार, पुन्हा कोरोनास आमंत्रण देणार. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा नवा जनुकीय स्ट्रेन्स पाश्चिमात्य देशात आढळल्यावर पुन्हा तो नव्या रूपात पसरू शकतो. त्याला आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.
रात्री ११नंतर यासाठी पोलिसांची विशेष तपासणी सुरू आहे. रस्त्यावर पाचपेक्षा जास्त लोक ११नंतर दिसून आल्यावर त्यांना दंडुक्याने ठोकून काढण्याचा शिरस्ता पोलिसांनी सुरू ठेवला. त्याचबरोबर कामावरून उशिरा परतणाऱ्या चाकरमान्यांनाही या संचारबंदीचा फटका बसत आहे. ११नंतर कामावरून घरी परतणाऱ्यांना संचारबंदीला तोंड द्यावे लागत आहे. ओळखपत्र आणि सबळ कारण सांगितल्याशिवाय पोलिसांच्या तावडीतून रात्री परतणाऱ्यांची सुटका होत नाही. सबळ कारण दिले गेले नाही तर पोलीस दुचाकीचालक असो की चार चाकी वाहन त्यांची चावी जमा करून त्यांना शिक्षा देत आहेत. मोकाट फिरणाऱ्यांना थेट पोलीस स्टेशनला नेले जाते. यामुळे ११ नंतर मोकाट फिरणाऱ्यांवर वचक बसला आहे.
डोंबिवली औद्योगिक वसाहत डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ४५० कारखाने आहेत. तेथे तिन्ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या जवळपास एक लाखांच्या घरात आहे. सध्या अनलॉकमध्ये कारखाने जोमात सुरू झाले आहेत. मात्र, सध्या रात्री ११ नंतर संचारबंदी लागू असल्याने सेकंड शिफ्ट करून सुटणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. मानपाडा परिसरातील पोलीस बंदोबस्ताला कामगारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कामगारांनी सेकंड शिफ्टची वेळ बदली करा, अशी मागणी केली आहे.
कल्याणमधील लक्ष्मी मार्केटकल्याण स्टेशन परिसरातील लक्ष्मी मार्केटमध्ये तब्बल ४०० फळ-भाजीपाला विक्रेते आहेत. हा परिसर दाटीवाटीचा आहे. लाॅकडाऊमध्ये तब्बल नऊ महिने हे मार्केट बंद होते. अनलॉकमध्येही ते पुन्हा सुरू करण्याची परवानगी नव्हती. ते काही अटीशर्थींवर सुरू केले असले तरी आता त्याला पुन्हा संचारबंदीच्या नियमाचा फटका बसला आहे. रात्री १० वाजेपर्यंत सुरू असलेले मार्केट आता साडेनऊ वाजताच सामसूम होते. संचारबंदीमुळे ग्राहक लवकर येऊन भाजी घेऊन घरी जातात.
महात्मा फुले चौक कल्याण रेल्वे स्थानकाजवळच महात्मा फुले चौक आहे. तेथे न्यायालय, सहायक पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे. मात्र, या चौकात संचारबंदीचा धाक नाही. कारण पुतळ्याच्या शेजारीच कल्याणमधील नशाबाजांचा अड्डा बनला आहे. त्या ठिकाणी पुतळ्याला नशाबाजांनी घेरले आहे. काही दारुडे स्टेशन परिसरातील दुकानाचा आसरा घेतात. त्यात गर्दुल्ल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे रात्री घरी जाणाऱ्या सामान्यांना या लाेकांचा त्रास सहन करावा लागताे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकछत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षाचालकांचे स्टॅण्ड आहेत. त्या ठिकाणी ११ नंतरही प्रवाशांच्या प्रतीक्षेत ते दिसून येतात. तसेच चौकात मटका कुल्फीवाल्यांच्या गाड्या असतात. त्या रात्री ११नंतरही लागलेल्या पाहावयास मिळतात. अवजड वाहनांची येजाही सतत सुरू असते. त्यामुळे शिवाजी चौक हा ११नंतर सामसूम होत नाही. दहा टक्के वर्दळ सुरूच असल्याचे पाहावयास मिळते.