कल्याण : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे नऊ वर्षांपूर्वी अपहरण केल्याप्रकरणी आरोपी राजा नायर याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी शिक्षा ठोठावली आहे.
मुलगी अल्पवयीन असताना तिच्या पालकांच्या रखवालीतून तिला बंगळुरू येथे पळवून नेल्याच्या आरोपाखाली नायर याला पाच वर्षांची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड तसेच तिला राज्यातील अन्य भागांत फिरवून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याच्या आरोपाखाली आठ वर्षांची कैद सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने अधिक कारावास भोगावा लागेल. या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. न्यायालयात सरकार पक्षातर्फे एस. जे. बठेजा यांनी बाजू मांडली.
नऊ वर्षांपूर्वी मुलगी कल्याणला काही कामानिमित्त गेली होती. तेव्हा तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या नायर याने तिचे अपहरण केले. मुलगी घरी न परतल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांनी तक्रार दाखल खरून घेत तिचा शोध घेतला. मुलीच्या तक्रारीनुसार नायरच्या विरोधात अपहरण, फसवणूक, छळाची तक्रार दाखल होऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कल्याण न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपी, साक्षीदार, तक्रारदार यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने नायर याला शिक्षा ठोठावली आहे.
गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने बिंग फुटले
नायर हा त्या मुलीला घेऊन महाराष्ट्राच्या विविध भागांत फिरत होता. त्यानंतर तो तिला बंगळुरूला घेऊन गेला. तिथे फिरत असताना गस्तीवरील पोलिसांना त्याचा संशय आला. त्याला हटकले असता तो गडबडला. अधिक चौकशी केला असता त्याचे बिंग फुटले. बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक करून मानपाडा पोलिसांच्या हवाली केले.