अनिकेत घमंडी, डोंबिवली: रेल्वेतून पडून होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेट्रो प्रमाणे लोकलचा फुटबोर्ड व प्लॅटफॉर्मची उंची समपातळीत करावी अशी प्रवासी संघटनांची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. मुंबईत ज्या रेल्वेमार्गावर व स्टेशनातील प्लॅटफॉर्मवर केवळ आणि केवळ लोकलची वाहतूक असते. अशा छशिमट उपनगरीय स्टेशन प्लॅटफॉर्म नं. १ ते ७ पर्यन्त, छशिमट ते पनवेल/गोरेगाव हार्बर लाईन, ठाणे - वाशी / नेरूळ ट्रान्सहार्बर लाईन, नेरूळ - उरण लाईन तसेच छशिमट- कल्याण दरम्यान स्लो काॅरीडाॅर ह्या सेक्शनवरील प्लॅटफॉर्मची उंची लोकलच्या फुटबोर्ड समान करण्यास काय समस्या आहे. असा सवाल ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे. मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या फुटबोर्डची उंची व मेल/एक्सप्रेस गाड्यांची रुंदी लोकल पेक्षा वेगळ्या मापाची असल्यामुळे व मुंबईत अनेक रेल्वे मार्ग व प्लॅटफॉर्म वरून लोकल व मेल/एक्सप्रेस अशी मिश्र पध्दतीची वाहतूक होत असल्यामुळे तसे करता येत नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.
त्यामुळे जेथे लांबपल्याच्या गाड्या येतात ते फलाट सोडून अन्य ठिकाणी ती कामे करायला हवीत, जेणेकरून अपघाताचे प्रमाण अल्प होईल. सध्या प्लॅटफॉर्म व लोकलच्या उंचीत १० इंच ते १ फुट अंतर असते. ह्या अधिकच्या उंचीमुळेच लोकल मध्ये चढता/उतरतानाच्या रेटारेटीत ह्या गॅपमधून प्रवासी रूळात पडण्याच्या घटना नियमित घडत असतात. तसेच ह्या अधिकच्या उंचीमुळे जेष्ठ नागरीक, गरोदर महिला, लहान मुले व अपंग व्यक्तींना लोकलमध्ये चढतात उतरताना अतिशय त्रास होतो. वातानुकूलित बरोबर मेट्रो पध्दतीच्या रचनेच्या लोकल मुंबई महानगरात चालवण्याचा विचार सध्या सुरू असताना, लोकलचा फुटबोर्ड व प्लॅटफॉर्म समपातळीत का केला जात नाही? किमान प्रायोगिक तत्त्वावर छशिमट उपनगरीय अथवा अन्य एखाद्या स्टेशनातील एक प्लॅटफॉर्म तरी समपातळीत बनवावा म्हणजे ह्याचे फायदे/तोटे, सोयी/गैरसोई अभ्यासता येतील व ह्या ठीकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोईसाठी वर उल्लेख केलेल्या सेक्शन बरोबरच मुंबई महानगरातील इतर सेक्शनवर अंमलात आणता येईल असे संघटनेचे म्हणणे आहे.