अनिकेत घमंडी,डोंबिवली: कल्याण परिमंडलामध्ये लोकाभिमुख प्रशासनातून उत्कृष्ट व तत्पर ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच वीज गळती कमी करून महावितरणच्या महसूल वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी सांगितले. महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी पदोन्नतीवर सोमवारी कार्यभार स्वीकारला.
त्याआधीचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची मुंबईतील बांद्रा येथील मुख्य कार्यालयात समकक्ष पदावर बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी मिश्रा रुजू झाले. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली सन २०१९ ते २०२२ या कालावधीत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत राज्यात शेतकऱ्यासांठी एक लाख सौर कृषिपंप कार्यान्वित झाले. तसेच सौर ऊर्जा निर्मितीचे एक हजार २३० मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलर रुफ टॉप आणि ईव्ही चार्जिन्ग स्टेशन उभारणीच्या विशेष कामगिरीबाबत महावितरणला विविध पुरस्काराने गौरवण्यात आले.