डोंबिवली - भर पावसात उपनगरी लोकल वाहतूक गुरुवारी सुसाट धावली. बुधवारी रात्रभर पावसाच्या जोरदार सरींवर सरी कोसळल्या, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होईल असे प्रवाशांना वाटले होते, मात्र घडले उलटेच लोकलसुरू होत्या आणि त्या ही वेळापत्रकानुसार. एरव्ही सकाळी ८.५८ वाजता डोंबिवली येथे येणारी एसी लोकल गुरूवारी अगदी वेळेत आली, त्या गाडीत तोबा गर्दी असते, मात्र गुरुवारचे चित्र काहीसे दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया महिला प्रवाशांनी दिली.
डब्यात मोकळा श्वास घेता येईल एवढी जागा असल्याचे सांगितले. हवामानखात्याने दिलेल्या रेड आणि अरेंज अलर्टने आयटीसह अन्य क्षेत्रातील चाकरमान्यांनी सकाळचा प्रवास टाळणे पसंत केले, अनेकानी वर्क फ्रॉम होम करणे पसंत केले. त्यामुळे बहुतांशी लोकलमध्ये गर्दी आटोक्यात असल्याचे दिसून आले. सकाळी मुंबई, ठाणे परिसरात कामावर गेलेले चाकरमानी मुंबईत पावसाचा जोर वाढताच सुरक्षितता बाळगत लवकर निघाले, त्यावेळीही।दुपारी ४ वाजेपर्यंत लोकल वाहतूक डाऊन मार्गावर वेळापत्रकानुसार असल्याचे सांगण्यात आले.
कल्याण, डोंबिवली परिसरात दुपारी एक वाजेपर्यंत फारसा पाऊस नव्हता, मात्र त्यानंतर पावसाने संध्याकाळपर्यंत जोरदार हजेरी लावली, त्यामुळे अंबरनाथ बदलापूर मार्गावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रेल्वे रुळात काहीसे पाणी जमायला सुरुवात झाल्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते.