कल्याण- शहराच्या पूर्व भागातील खडेगोळवली आणि माणोरा गाव परिसरात पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांकडून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविला जात नाही. पाणी कधी मिळणार असा संतप्त सवाल उपस्थित करीत महिला वर्गाने आज आय प्रभाग कार्यालयाच्या समोरच ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले. आत्ता तरी प्रशासनाने आमची दखल घेऊन पाणी प्रश्न सोडवावा अशी आपेक्षा आंदोलन करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली आहे.
यंदाचा पाऊस चांगला पडल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेस पाण्याचा प्रश्न उद्धवला नाही पाहिजे. मात्र कल्याण ग्रामीण भागातील दावडी, भोपर भागात पाण्याचा प्रश्न तीव्र आहे. चांगला पाऊस होऊन धरणो भरुन देखील विविध भागात पाण्याची टंचाई जाणवते. त्याचबरोबर दोनच दिवसापूर्वी दावडी परिसरातील नागरीकांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन पाणी प्रश्न त्यांच्याकडे मांडला होता. त्यावर मंत्री चव्हाण यांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाचा कारभारच ढिसाळ असल्याचे म्हटले होते. लवकर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
ग्रामीण भागासह टाटा नाका येथील देशमुख परिसरातील नागरीकांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. त्यांचाही प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. ही परिस्थिती असताना आत्ता खडेगोळवली माणोरा गाव परिसरातील नागरीकांना पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी आय प्रभागासमोर ठिय्या देत महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले आहे. काही वेळेसाठी महिलांनी रास्ता रोको केला होता.टंचाई ग्रस्त भागाला महापालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र ज्या मालमत्ता धारकाकडून कर थकविला आहे. तसेच ज्या मालमत्ता कर बुडव्या आहे. बेकायदा चाळी, बांधकामे आहे. त्यांना टँकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कारण या टँकरवर दिवसाला एक लाख रुपयांचा खर्च होत होता. हे टँकर बंद केले आहे. आंदोलन करणा:या महिलांनी सांगितले की, आम्ही मालमत्ता कर भरतो. तरी देखील आम्हाला महापालिका पाणी पुरवठा करती नाही. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका कर भरणाऱ्या नागरिकांनीही बसला असल्याच्या मुद्याकडे महिलांनी लक्ष वेधले.