कल्याण- प्राणीमित्र संदीप पंडित कामावरून घरी परतताना सेवाग्राम एक्स्प्रेस या गाडीत एक अज्ञात इसम माकडाच्या लहान पिल्लाला घेऊन प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. त्या माकडाच्या गळ्यात दोरीने बांधून त्याचा खेळ करून पैसे मागण्याचा उद्देश होता.
कोणत्याही वन्यजीवास 1972 कायद्यान्वये बंदिस्त करू शकत नाही. अन्यथा दोषींवर कठोर कारवाई होते. प्राणीमित्र पंडित यांच्याकडून प्राथमिक माहिती मिळताच वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी रेल्वे पोलिस फोर्स यांच्या मदतीने या इसमास ताब्यात घेतले व कल्याण वनविभाग अधिकारी वनपाल राजू शिंदे, वनरक्षक रोहित भोई व योगेश रिंगणे यांच्या साहाय्याने सदर माकडाची सुटका केली.
माकडाच्या पिल्लाची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत आरोग्य तपासणी केली व स्थानिक वॉर संस्थेच्या मदतीने देखभाल सुरू आहे. लवकरच त्याला निसर्गमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सुहास पवार यांनी दिली.