मयुरी चव्हाण काकडे
कल्याण लोकसभेतील अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण आहे. कल्याण ग्रामीणचे राजकारण नेहमीच रंजक राहिलेले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि मनसेने लोकसभेत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर कल्याण ग्रामीणमध्ये कोणकोणते उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार? याची राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार या चर्चांना आता जवळपास पूर्णविराम लागलाय.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव अंतिम झाले असून याबाबत मातोश्रीवर अधिकृत घोषणा करण्यात आली अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुभाष भोईर विरुद्ध राजू पाटील असा सामना रंगणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सुभाष भोईर यांच्या नावाबाबत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या नावाची घोषणा केली असल्याचं समजतय. त्यामुळे कल्याण ग्रामीण मध्ये मशाल पेटवण्यासाठी भोईरांनी सर्वत्तोपरी तयारी सुरू केली असल्याची देखील माहिती समोर येत आहे. आता शिवसेना शिंदे गटाकडूनही अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे तिसरा उमेदवार कोण असणार? ते सुद्धा पहावं लागणार आहे.
सुभाष भोईर यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. याचं कारण म्हणजे मागील निवडणुकीत त्यांचे आमदारकीचे तिकीट व्हाया ठाणे कापण्यात आलं अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे भोईर हे नाराज होते. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं त्यांनी पसंत केलं. २०१४ ला शिवसेनेकडून आमदारकीच्या निवडणुकीत उभे होते आणि ते निवडून देखील आले. आता पुन्हा आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भोईर पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार हे नक्की. मागील निवडणुकीमध्ये भोईर यांचा तिकीट कापून ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र मनसेच्याराजू पाटील यांनी म्हात्रे यांचा पराभव केला. आणि कल्याण ग्रामीण मनसेच्या ताब्यात गेलं.
जर शिंदेंच्या सेनेकडूनही इथून उमेदवार उभा राहिला किंवा कोणी बंडखोरी केली तर ही निवडणूक अधिकच मजेशीर होणार असा अंदाज व्यक्त होतोय. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून सुभाष होईल यांचे सुद्धा नाव चर्चेत होतं. आता मातोश्रीवर झालेल्या बैठकीत कल्याण ग्रामीणसाठी भोईर यांच्या नावाला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्तेही सज्ज झालेले आहेत. येणाऱ्या दिवसात भोईरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते कल्याण ग्रामीणमध्ये सभा घेण्याची शक्यता आहे.