मुरलीधर भवार, कल्याण :- लोक कल्याण पब्लिक स्कूल च्या आस्था प्रकाश नायकर आणि सेंट मेरी शाळेच्या देवांस अविनाश राणे हे फलेंडर ग्रँड प्रिक्स या जागतिक स्केटिंग स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यातून आस्था आणि देवांश या दोघांचीच निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. भारताच्या संघात एकूण १२ खेळाडू आहेत.
ऑलम्पिकमधील सुवर्णपदक विजेते विलेन बार्टस्वींग यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानमध्ये गेल्या १५ दिवसापासून दोघेही सराव करत होते. आस्था आणि देवांश यांना राज्य स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पुष्पेद्र सिंग, श्रीपाद शिंदे, पवन ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जागतिक स्पर्धेसाठी आस्था आणि देवांश यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड, प्राध्यापक लक्ष्मण इंगळे , छत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर, सुभाष गायकवाड यांनी त्यांचे काैतूक केले आहे. आस्थाची आई सुप्रिया यांनी सांगितले की, आस्था ४ वर्षाची असल्यापासून स्केटिंग खेळते आहे. तिने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची झालेली निवड ही खरच आमच्या कुटुंबासाठी आनंदाची बाब आहे. तिने यश संपादन करुन देशाचे नाव उज्वल करावे अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.
देवांशचे वडिल अविनाश यांनी सांगितले की, देवांश स्केटिंग खेळात सुरुवात केल्यानंतर एवढी मोठी मजल मारेल असे कधी वाटले नव्हते. त्यांनी घेतलेली मेहनत आणि केलेला सराव कौतुकास्पद आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याची झालेली निवड हे त्याच्याच मेहनतीचे फळ आहे. या स्पर्धेमध्येही तो नक्कीच यश प्राप्त करेल अशी मला खात्री आहे.