कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३ लाख ८४ हजार मतदार असून, जवळपास एक लाख मतदारांची नावे बाद करण्यात आली. मतदार यादीत मृत मतदारांची नावे होती, तर जिवंत मतदारांची नावे गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने मतदार संतापले. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रावर मतदारांनी ठिय्या मांडला. यामुळे काही काळासाठी मतदान प्रक्रिया मंदावली. संतोषी माता रोड परिसरात राहणारे अतुल फडके हे १९८४ पासून मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यांच्या घरातील अन्य सर्व सदस्यांची नावे यादीत होती. मात्र, अतुल यांचे नाव गायब होते. गायकर पाडा येथे राहणारे धर्मेंद्र भट आणि त्यांच्या पत्नीचे मतदार यादीत नाव नव्हते. त्याचबरोबर, ६० जणांची नावे यादीतून गायब होती. कल्याणच्या जोशी बागेत राहणारे डॉ. विनाेद पंजाबी यांचे नाव मतदार यादीत होते. मात्र, त्यांच्या मतदार ओळखपत्रावर त्यांच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यापासून रोखण्यात आले.
... अन् अधिकारी निरूत्तरउद्धवसेनेचे पदाधिकारी नीलेश भोर यांच्यासह पक्षाचे संघटक रवींद्र कपोते यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे याविषयी विचारणा केली असता, त्यांनी यादीत नाव नसलेल्यांना सहा नंबरचा अर्ज भरून द्यावा. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत येईल. मात्र, मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्याचे काय, या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
९२ वर्षीय आजीचे मतदानमोहिंदरसिंग काबूल सिंग शाळेतील मतदान केंद्रावर ९२ वर्षांच्या सुहासिनी पानसरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. ८९ वर्षीय प्रभाकर पाठक हे पक्षाघाताने आजारी असतानाही त्यांनी मतदान केले.
महिलेच्या नावाने केले मतदान कल्याण पश्चिमेतील प्रियांका कुलकर्णी या बाजारपेठ परिसरात राहतात. त्या मतदानाला गेल्या असता, त्यांच्या नावावर अन्य कुणी मतदान केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना धक्का बसला.
हक्क न बजावता औरंगाबादला उंबर्डे परिसरातील ५३ वर्षीय प्रकाश काऊतकर हे वाहनचालक आहेत. ते कामानिमित्त औरंगाबादला राहतात. नाव नसल्याने केंद्रावर पोहोचताच त्यांच्या पदरी निराशा आली. मतदानाचा हक्क न बजावताच त्यांना औरंगाबादची गाडी पकडावी लागली.
माजी आयुक्तांचे मतदान केडीएमसीचे माजी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कल्याण लोकसभेत मतदानाचा हक्क बजावला.