बदलापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपने बदलापुरात आयोजित केलेल्या बैठकीकडे आमदार किसन कथोरे यांनी पाठ फिरवल्याने पाटील-कथोरे यांच्यातील भेटीनंतरही उभयतांमधील वाद संपुष्टात आले नसल्याची चर्चा सुरू आहे. उमेदवारी जाहीर होताच पाटील यांनी कथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर कथोरे हे पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होतील, अशी अपेक्षा होती. बदलापुरात मंगळवारी सायंकाळी कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या पहिल्याच बैठकीला कथोरे गैरहजर राहिले. ते न दिसल्यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली. काही पदाधिकाऱ्यांनीही त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. कथोरे बैठकीला हजर राहणार नाहीत, याची कल्पना असल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीची कल्पना देण्यात आली होती. मात्र, सकाळपासून मी मुंबईत एका कामानिमित्त असल्यामुळे मला बदलापूरच्या बैठकीला उपस्थित राहणे शक्य झाले नाही.-किसन कथोरे, आमदार
शिंदेंसमोर भाजप पदाधिकारी बसले गप्पदरम्यान, अंबरनाथमध्ये कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहणारे पदाधिकारी व माजी नगरसेवक यांना बैठकीत नाराजी व्यक्त न करण्याची तंबी भाजपच्या नेतृत्वाने दिल्याने भाजपची मंडळी या बैठकीत चिडीचूप होती. भाजपला वेगवेगळ्या बाबतीत मिळणारी सापत्न वागणूक व कार्यक्रमांना डावलणे यावरून शिवसेना व भाजपच्या मंडळींत गेले काही दिवस वाद सुरू आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन अलीकडेच त्याला वाचा फोडली होती.