डोंबिवली: एमआयडीसी निवासी सर्व्हिस रोडवर प्लॉट क्रमांक आरएम २३ जवळ जमिनीखाली पाइपलाइन मधून पाण्याची मोठी गळती सुरू असल्याची माहिती परिसरातील रहिवासी दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी दिली. ते म्हणाले की, गुरुवारसकाळ पासून ती समस्या जास्त सुरू आहे. आधीच एमआयडीसी निवासी परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचा दाब कमी झाल्याने नागरिक तक्रार करीत आहेत. यासाठी एमआयडीसीवर नागरिक मोर्चे पण घेऊन जात आहेत. पाण्याच्या गळती अशा अनेक ठिकाणी चालू असून नागरिक हैराण असून प्रशासन सुस्त आहे अशी टीका करण्यात आली.
एमआयडीसी प्रशासनाला या गळती बद्दल कळविण्यात आले असून कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात काही परिसरात गेले काही महिने अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. विशेष उष्मा पेट्रोल पंप समोरील घरांना पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने येत होता. अनेकदा त्याबाबतीत तक्रारी करून ही एमआयडीसी कडून दखल घेतली जात नव्हती.
अखेरीस मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता निवासी भागातील रहिवाशांनी एमआयडीसी वर धडक मारून पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता श्री आनंद गोगटे यांच्या दालनात भेट घेऊन त्यांच्यापुढे विविध तक्रारींचा पाढा कथन केला. त्यांना रहिवाशांतर्फे एक निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी सदर प्रश्न दोन दिवसांत सोडविण्याचे आश्वासन दिले असून त्यांनी रहिवाशांचा मागणी नुसार ताबडतोब दोन सहाय्यक अभियंता यांना रहिवाशांसोबत प्रत्यक्ष जागेवर पाठवून पाहणी करून येण्यास सांगितले होते. त्यात अशी पाणीगळती सुरू असल्याने नागरिक नाराज असुन एमआयडीसी प्रशासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत असल्याचे नलावडे म्हणाले.