डोंबिवली - संदप येथील व्यावसायिक प्रल्हाद म्हात्रे यांच्या आत्महत्या प्रकरणात नाहक भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांना गुंतवलं जात आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दबावतंत्रचे राजकारण केलं जात असून तपास यंत्रणेने निःपक्षपातीपणे चौकशी करावी, त्यापूर्वीच नाहक भाजपच्या पदाधिकाऱ्याला बदनाम करु नका, राष्ट्रवादीची तशी भूमिका सगळ्यांना माहिती आहे अशी टीका कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी राष्ट्वादी काँग्रेस वर केली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी संदीप माळी यांना अटक करण्याची मागणी केली होती, त्या विषयावर शनिवारी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी कांबळे बोलत होते. कल्याण ग्रामीण मतदारसंघात संदप गावात राहणारे प्रल्हाद पाटील यांनी दिवा वसई मार्गावर ट्रेन खाली आत्महत्या केली, त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडियो तयार केला होता, तो व्हिडिओ व्हायरल झाला होती. व्यवसायात त्यांना काही जणांनी त्रास दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणी भाजप कार्यकर्ते माळी यांच्यासह पंधराजणां विरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत माळी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
भाजपच्या नेत्यांचे माळी यांना पाठबळ असल्याचा देखील आरोप तपासे यांनी केला होता. त्यानंतर आता भाजपने देखील राष्ट्रवादी विरोधात आक्रमक पवित्र घेतला असून शशिकांत कांबळे, ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, संदीप माळी यांचे चुलत भाऊ अमर माळी, माजी नगरसेविका रविना माळी यांनी पत्रकार परिषद घेतली . कांबळे यांनी सांगितले की, संदीप माळी यांचा त्या प्रकरणात काही संबंध नाही. राजकीय षड्यंत्रातूनच त्याचं नाव या प्रकरणात गोवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी. राष्ट्रवादी कडून मागणी केली जात आहे ती राजकीय हेतूपोटी केली जाते. पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करावी उगाच कोणत्या व्यक्ती, पार्टी आणि परिवाराला नाहक बदनाम करू नये. राजकीय भांडवल करू नये असेही कांबळे म्हणाले.