बदलापूर : केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. या दोन नेत्यांच्या वादामुळे बदलापूर शहर आणि मुरबाड तालुक्यामधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. नेत्यांमधील वादामुळे व्यक्तिगत कामासाठी कोणाकडे जावे, असा प्रश्न कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पडला आहे.
गेल्या वर्षी मुरबाड नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आ. कथोरे आणि केंद्रीय मंत्री पाटील यांच्यात उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडली होती. यावेळी पाटील यांनी आपल्या काही उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत खा. पाटील यांचा हस्तक्षेप वाढल्याने कथोरे यांनी आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना उभे करून पाटील समर्थकांना धूळ चारली होती. त्याच निवडणुकीपासून दोन्ही नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले. मुरबाड आणि बदलापूर शहरात कथोरे यांचे वर्चस्व असल्याने कथोरे यांच्या निकटवर्तीयांना पाटील यांनी स्वतःकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यात काही अंशी त्यांना यश आले. बदलापूरमधील सर्वच पदाधिकारी आणि नगरसेवक यांना पाटील आणि कथोरे यांना सांभाळून काम करताना तारेवरील कसरत करावी लागत आहे. कार्यकर्त्यांची ही होणारी कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. या दोन नेत्यांमधील वाद संपुष्टात आणले होते. मात्र पाटील आणि कथोरे यांचा एकोपा जास्त दिवस टिकला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीमध्येदेखील उमेदवारीवरून कथोरे-पाटील यांच्यात वाद उफाळला. त्यामुळे हे दोघे आता थेट एकमेकांवर आरोप करू लागले आहेत.
विकास कामाचे श्रेय लाटण्यावरून या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. खासदार आणि आमदार यांच्यातच एकमत नसल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. एकमेकांच्या जवळ असलेल्या पदाधिकाऱ्यांना हेरून त्यांचा ‘बंदोबस्त’ करण्याचे काम दोन्ही नेते करू लागले आहेत. त्यामुळे पदाधिकारी नेत्यांच्या चक्रव्यूहामध्ये अडकले असून त्यातून कार्यकर्त्यांची सुटका होते की, ते आणखी अडकतात हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रवींद्र चव्हाण यांनी घेतली कथोरे यांची भेटप्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असलेले व आता डिस्चार्ज झालेले आमदार किसन कथोरे यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी भेट घेतली. आ. कथोरे यांची चव्हाण यांनी बदलापूरच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि कथोरे यांच्यातील वादामुळे कथोरे काही काळापासून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच कल्याण पश्चिममध्ये पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कथोरे उपस्थित न राहिल्याने या चर्चेला आणखी उधाण आले होते. मात्र, प्रकृती चांगली नसल्याने कथोरे त्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी कथोरे यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.