उल्हासनगर : मुख्यमंत्र्याच्या जिल्हातील महापालिका मध्ये वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर अधिकारी मिळत नसल्याने, महापालिकेचा कारभार स्थानिक लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे गेला. याप्रकारने महापालिका कारभारात सावळागोंधळ उडून विरोधी पक्षाचे नेते अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करीत आहेत.
उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागात गेल्या आठवड्यात एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांला बोगस कर्मचारी मिळून आला. असे सहा जण विना परवाना नगरचनाकार विभागात काम करीत असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे. मुळात कर्मचाऱ्यांची संख्या महापालिकेत कमी असल्याने, बनावट कर्मचारी ठेवण्याची वेळ अधिकाऱ्यावर आली का? या चर्चेलाही उधाण आले. तर दुसरीकडे महापालिकेतील शासन प्रतिनियुक्तीवरील महत्वाचे पदे वर्षानुवर्षे रिक्त असून आयुक्त अजीज शेख यांनी शासनाकडे मागणी करूनही अधिकारी दिले जात नाही. अखेर नाईलाजाने लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे वर्ग-१ व वर्ग-२ च्या ही महत्वाच्या पदाचा प्रभारी पदभार दिला जातो. अश्या लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून स्वच्छ, जलद कामाची अपेक्षा आहे का? असा प्रश्न आयुक्तासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांना पडला आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी एक उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, ३ कार्यकारी अभियंता, १ करनिर्धारक संकलक, १ वैधकीय अधिकारी, १ सहायक नगररचनाकार संचालक आदी पदे प्रतिनियुक्तीवर देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र या मागणीला वर्षानुवर्षे केराची टोपली दाखविली जात असल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे. तर दुसरीकडे अनिल खतूरानी, छाया डांगळे, राजेश घनघाव, राजा बुलानी आदी अनेक कर्मचारी लाच घेतांना रंगेहात सापडुनही त्यांच्याकडे वर्ग-१ व वर्ग-२ सारख्या महत्त्वाच्या पदाचा पदभार दिल्याचा आरोप महापालिका वर्तुळात होत आहे.
महापालिका तांत्रिक १४६ पदे भरणारमहापालिकेत अधिकाऱ्यांची ७० टक्के तर वर्ग-३ व ४ ची ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. रिक्त पदावर उतारा म्हणून महापालिका तब्बल १४६ तांत्रिक पदे भरणार आहे. यामध्ये शाखा अभियंता-१०, कनिष्ठ अभियंता-५, कार्यकारी अभियंता-१, अग्निशमन दलाचे सुरक्षा रक्षक-५६ तसेच विधुत मदतनिसाचे-४९ असे एकून १४६ पदाची जाहिरात काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे.