उल्हासनगर : शासनाच्या लाडली बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना रहिवासी व उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे. त्यासाठी तहसील तलाठी कार्यालयाबाहेर लाडली बहिणीला रांगा लावावे लागत असून सेतू केंद्र बंद असल्याने, आपले सरकार सेवा केंद्रा समोर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व उत्पन्न तसेच रहिवासी दाखल्यासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याची प्रतिक्रिया लाडल्या बहिणी देत आहेत.
शासनाने लाडली बहीण योजना लागू केली असून या योजनेचे महिलेकडून जोरदार स्वागत झाले. मात्र यायोजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणींना अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागत आहे. या योजनेसाठी २१ ते ६० वयोगटातील महिला पात्र असणार असून शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार ५०० रुपये पेक्षा जास्त नसावे, कुटुंबातील सदस्य करदाता नसावा, सरकारी अथवा कुटुंबातील कंत्राटी कामगार नसावा, इतर योजनेचा लाभ घेतला नसावा, राज्याचा रहिवासी असावा, चारचाकी वाहन नसावे तसेच संयुक्तपणे ५ एकर शेती नसावी. आदी निकष लाडली बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी लावण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेकडो महिलांनी तहसील कार्यालय परिसरात एकच गर्दी करून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी यांचा अहवाल घेण्यासाठी कार्यालया बाहेर रांगा लावल्या आहेत.
शासनाच्या लाडली बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ज्यांनी किमान २१ वर्षे पूर्ण केले असावे. तसेच वयाच्या ६० वर्षा पर्यंत लाभ मिळणार आहेत. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक केले आहे.
तहसील कार्यालयातील सेतू केंद्र बंद तहसील कार्यालयातील सेतु केंद्रातून विविध दाखले अत्यल्प किमतीत दिले जातात. मात्र गेल्या दिड वर्षांपासून सेतू केंद्र बंद असून विविध दाखल्यासाठी नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्राची मदत घ्यावी लागत आहे. याप्रकाराने जादा किमती देऊन दाखले घ्यावे लागत असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली.
दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज. तहसिलदार कल्याणी कदम नागरिकांना विविध दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागते, मग अर्ज सेतुतून करा की,आपले सरकार सेवा केंद्रातून. सेतुकेंद्रात गैरप्रकार झाल्याने, बंद करण्यात आला होता. मात्र सेतू केंद्राचा ठेका दिल्याने, लवकरच सेतुकेंद्र सुरू होणार आहे.