अनिकेत घमंडी, डोंबिवली: आपत्कालीन वैद्यकीय सेवा वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव, गुरूवारी कल्याणरेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस नवीन विकसित अपघात विभागाचे उद्घाटन केले. त्यांनी कॅज्युअल्टी येथे नवीन डिजिटल एक्स-रे उपकरणांचे अनावरणही केले. ही अत्याधुनिक उपकरणे रोगनिदान प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि गरजू रुग्णांसाठी त्वरित वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे.
याव्यतिरिक्त, अखंड रुग्ण सेवेसाठी मध्य रेल्वेच्या वचनबद्धतेचा दाखला म्हणून, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी वैद्यकीय विभागाला इलेक्ट्रिक कार्ट प्रदान केली. ही इलेक्ट्रिक कार्ट सेवानिवृत्त लाभार्थी आणि रूग्णांना स्थानकापासून अपघात विभागातपर्यंत नेण्यासाठी मदत करेल. यामुळे पारगमन प्रक्रिया सुलभ आणि कार्यक्षम होईल. या सुविधेमुळे सर्व रेल्वे कार्डधारक रूग्णांना तात्काळ आपत्कालीन सहाय्य मिळेल.
गंभीर प्रकरणे स्थिर होईपर्यंत अपघात विभागात ठेवली जातील. त्यानंतर विभागिय रेल्वे हॉस्पिटल, कल्याण येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. ज्या रूग्णांना रेल्वे सुविधांच्या पलीकडे जीवरक्षक उपचारांची आवश्यकता आहे, त्यांना पॅनेलमधील रूग्णालयांमध्ये हलवण्यापूर्वी त्यांना येथे त्वरित प्रथमोपचार प्रदान केले जातील. समारंभास प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. मीरा अरोरा यांची उपस्थिती होती आणि मुंबई विभागाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र बी गांगुर्डे यांच्या द्वारे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाखा अधिकारी, युनियन सदस्य, रेल्वे कर्मचारी आणि सेवानिवृत्त लाभार्थी यांचा उत्साहपूर्ण सहभाग होता.