कुलदीप घायवटकल्याण : आटगाव-कसारादरम्यान लोकलमध्ये रात्री तरुणीचा विनयभंग करण्याची घटना घडली. या घटनेविरोधात प्रवासी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे स्थानकांवर आणि लोकलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
मुंबई उपनगरीय मार्गावरील रेल्वेस्थानकांतील कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडत आहेत. जानेवारी २०२० मध्ये पश्चिम रेल्वेमार्गावरील माटुंगा रोड रेल्वेस्थानकावर एका विकृताने तरुणीचा विनयभंग करण्याची घटना घडली होती. त्यानंतर, तेथील सुरक्षाव्यवस्था वाढवून उपाययोजना केल्या होत्या. मात्र, कल्याण-कसारा, कर्जतकडील रेल्वेमार्गावर सुरक्षाव्यवस्था कमी असल्याचे मत प्रवासी संघटनेने मांडले. सध्या लोकलमधील गर्दी कमी आहे. रात्री महिलांची संख्या कमी असते. त्यामुळे लोकलमध्ये गस्त घालणे आवश्यक आहे. महिला प्रवाशांचा प्रवास हा भयमुक्त करण्यासाठी विशेष पावले उचलणे अपेक्षित आहे. अनेक रेल्वेस्थानकांवर गर्दुल्ले दिसून येतात. त्यांना हटवले पाहिजे. २४ तास रेल्वेस्थानकांवर गस्त गरजेची असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
खडवली ते कसारादरम्यान चोरीच्या घटना वाढत आहेत. पहाटे दूधवाले, भाजीपालावाले यांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. पाच वर्षांपासून संघटनेतर्फे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली जात आहे. प्रत्येक लोकलमध्ये होमगार्ड, आरपीएफ, एमएफएस यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. - राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण कसारा-कर्जत प्रवासी महासंघ
लोकलमध्ये सर्वसाधारण प्रवाशांना मनाई असताना आरोपी असलेले दोन तरुण लोकलमध्ये चढले कसे? कसारा, कर्जत दिशेकडे लोकल जात असताना लोकलमध्ये प्रवाशांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचारी लोकलमध्ये असायला पाहिजेत. संबंधित तरुणीला लोकलमधून ढकलून दिले असते, तर प्रशासनाला जाग आली असती का? पकडलेल्या आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. - लता अरगडे, सरचिटणीस, उप.रेल्वे प्रवासी महासंघ