कल्याण- कल्याण मुरबाड रोडवरील इंदाला शिक्षण संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या इन्व्हेंशन अॅण्ड इनक्यूबेशन सेंटरचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सेंटरमुळे तंत्र, अभियांत्रिकी आणि कौशल्य शिक्षणाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. या सेंटरमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबर यातून अनेकांना रोजगार देणारा उद्योजक तयार होणार आहे.
कै. भास्करराव महाजन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने बापसई येथे इंदाला अत्याधुनिक शिक्षण संस्थेच्या वतीने सेंटरचा शुभारंभ आमदार कथोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स्कील व्होकेशनल एज्युकेशन अॅण्ड ट्रेनिंगचे संचालक योगेश पाटील, ग्रोक लर्निग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कुमावर, संस्थेच्या अध्यक्षा जयश्री महाजन, संचालक डॉ. विजय महाजन, सीईओ लिमेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
या सेंटरच्या माध्यमातून आयओटी, रोबोटिक, डाटा सायन्स, आर्टिर्फिशल इंटेलिजन्स, थ्री डी प्रिंटींगचे शिक्षण घेता येणार आहे. पाठपुस्तकात शिकविले जाणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची अंमलबजावणी प्रत्यक्ष जीवनात कशी करावी यावर या सेंटरच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. या सेंटरचा लाभ केवळ इंदाला शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच नव्हे तर कल्याण मुरबाड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. महानज यांनी यावेळी दिली.
मुंबई ठाणे पश्चात मुरबाड मतदार संघात अशा प्रकारचा पहिलाच शिक्षण प्रयोग केला जात असून ही शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्याने या ठिकाणी शिक्षण घेणा:या विद्यार्थ्यांना रोजगार मिळणे शक्य होईल. तसेच यातील काही विद्यार्थी ही अनेक हाताना रोजगार देणारे होऊ शकता याकडे आमदार कथोरे यांनी लक्ष वेधले.
ग्रोक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमावर यांनी सांगितेल की, परदेशी ५० टॉप कंपन्यामध्ये भारतीय लोक सीईओ पदी कार्यरत आहे. आपल्याकडे बौद्धीक चातुर्य आहे. त्याचा उपयोग भारत महासत्ता झाला पाहिजे याकरीता झाला पाहिजे. आपल्या देशात आपण रोजगार निर्माण करुन शकलो तर देश महासत्ता नक्कीच होईल. त्यासाठी अशा प्रकारच्या इन्व्होशन आणि इन्क्यूबेशन सेंटर महत्वाची भूमिका बजावू शकतात.