कल्याण : आफ्रिकेतील केपटाऊन येथून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी जनरल प्रॅक्टीशनर आणि खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधून काही देशातून आलेले प्रवासी उपचारासाठी आल्यास, त्यांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास द्यावी, असे आवाहन महापालिका अयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
आफ्रिकेतील केपटाऊन या शहरातून डोंबिवलीत आलेल्या त्या संशयित रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याच्या जिनोम सिक्वेन्सींगचा अहवाल अद्याप येणो बाकी आहे. त्यांच्या कुटुंबातील आठ जणांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तसेच, तो राहत असलेल्या इमारतीमधील नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.
ज्या विमानाने संशयित रुग्णाने प्रवास केला आहे. त्या विमानात त्याच्याबरोबर प्रवास करणाऱ्या सह प्रवाशांची यादी विमान कंपनीने उपलब्ध करुन दिल्यास. त्यापैकी प्रवासी कल्याण डोंबिवलीतील असल्यास त्यांचीही कोरोना चाचणी केली जाईल. कल्याण डोंबिवली महापालिकेने पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेनंतर तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवली होती. त्यानुसार महापालिकेची तिसऱ्या लाटेशी सामना करण्याकरीता पर्याप्त बेड, ऑक्सिजन यंत्रणा आणि आयसीयू बेड, व्हेटिंलेटर बेड तयार आहेत.
याचबरोबर कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यावर काही कोविड रुग्णालये बंद करण्यात आली होती. त्या रुग्णालयातील यंत्रणा तशीच आहे. ती रुग्णालये पुन्हा सुरु केली जातील. नागरिकांनी विना मास्क घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टसिंगचा वापर करावा. विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्तरित्या पुन्हा दंडात्मक कारवाई सुरु केली जाणार आहे. तसेच, नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.