लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनामुळे अनेक पालकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे आपल्या पाल्याची शाळेची फी कशी भरायची? हा प्रश्न अनेक पालकांच्या समोर आहे. सुधाश्री सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे करत पाच गरीब विद्यार्थ्यांची शाळेची फी भरली. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामचंद्रनगर येथे शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये केलेल्या या मदतीचे नागरिकांनी कौतुक केले. सुधाश्री संस्थेच्या संचालक माधुरी जोशी यांनी मदतीचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला.
कोरोना महामारीत अनेकांवर आर्थिक संकट कोसळले परिणामी विद्यार्थ्यांची फी भरणे काही पालकांना शक्य झाले नाही. या समस्येमुळे शा विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण बंद पडू नये म्हणून डोंबिवलीत अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. याचाच भाग म्हणून सुधाश्री सेवाभावी संस्थेच्या माधुरी जोशी यांनी या शाळेतील कार्तिक मोरे, रूपम शिंदे, दूर्वाक पिटेकर, मयुरी माळी, आदित्य सगवेकर या विद्यार्थ्यांची शाळेची बाकी असलेली फी भरली आहे.
आर्थिक संकटामुळे गरीब गुणवंत विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण बंद होता कामा नये. म्हणून शाळेतील पाच मुलांच्या शिक्षणासाठीच्या फीचा चेक शाळेकडे जमा केला. तसेच आमची संस्था या व्यतिरिक्त गोपाळनगर, गणेश पथ आणि जोशी हायस्कूल इत्यादी विद्यार्थ्यांची फी भरणार असल्याची माहिती जोशी यांनी यावेळी दिली.