कल्याण - शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे हल्ला प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या मागणी करीता शिंदे समर्थक नगरसेवक आणि नेत्यांनी कल्याणचे पोलिस उपायुक्तांना निवेदन दिले आहे. उद्धव ठाकरे समर्थक असलेल्या पालांडे यांना शिंदे गटाचा पाठिंबा मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात शिवसेना उपशहर प्रमख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालांडे यांना फोन केला होता. त्यांच्या तब्येतची चौकशी केली होती. घटनेच्या दोन तासानंतर कोळसेवाडी पोलिसांनी गौतम सोनवणो आणि अंबादास कांबळे या दोन हल्लेखोरांना अटक केली पालांडे यांनी हल्ल्यामागे एका माजी शिवसेना नगरसेवकाचे नाव घेतले होते. त्यांनी त्या आरोपाचे खंडन केले.
पोलिसांनी आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले. एकीकडे पोलिस आरोपींना हजर करीत होते. तर दुसरीकडे नुकतेच शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख पदाचा त्याग करुन शिंदे गटाला जाहीर पाठिंबा देणारे गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वात कल्याण आणि उल्हासनगरामधील आजी माजी नगरसेवकांना सोबत घेऊन पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना निवेदन दिले आहे.
हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. निश्चीत पणो कसून चौकशी झाली पाहिजे. अशी घटना पुन्हा व्हायला नको याची दक्षता घेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही निवेदन दिले आहे. पोलिस उपायुक्त याचा छडा लावतील असे लांगडे यांनी सांगितले.