मुरलीधर भवार, कल्याण:कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर झालेल्या गोंधळाची चाैकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. नागरीकांनी आयुक्तांना भेटण्याकरीता गर्दी केल्याने हा प्रकार घडला. या घटनेनंतर कर्मचाऱ््यांना भेटण्यासाठी ठराविक दिवस ठरविण्यात आला आहे असे उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले.
मागच्या आठवड्यात महापालिका आयुक्त काही कामानिमित्त महापालिकेत हजर नव्हता. त्यामुळे नागरीकांना त्यांची भेट घेता आली नाही. मात्र काल नागरीकांना भेटीसाठी वेळ देण्यात आली होती. रांगेत उभ्या असलेल्या ५१ जणांना टोकन दिले गेले होते. याच रांगेत महापालिका कर्मचारी रमेश पौळकर हे देखील उपस्थित होते. सुरक्षा रक्षक अधिकारी सुरेश जगताप आणि महिला सुरक्षा रक्षक सरिता चरेगावकर यांनी पौळकर यांना मारहाण केल्याचे रांगेत उभ्या असलेल्या नागरीकांनी सांगितले. तसेच मारहाण केल्याचा आरोप स्वत: पौळकर यांनी देखील केला आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकरणी काही सांगण्यास नकार दिला होता. मात्र या घटनेनंतर आज उपायुक्त जाधव यानी याविषयी चौकशी सुरु असल्याचे सांगितले. या घटनेनंतर पौळकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला आहेत. पोलिसांकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे.