कल्याण- शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम पोलीस अधिकारी करत आहे. श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची भाषा केली ती अत्यंत चुकीची आहे. त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांचे कार्य उत्तम आहे. अधिकारी भाजप-शिवसेना युती आणि खासदार शिंदे यांच्या पेक्षा मोठा आहे का? त्यांचे लाड करण्याची गरज काय? असा सवाल भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. त्याच्यावर श्रीकांत शिंदे यांनी कारवाई करावी. त्यांची इथून हकलपट्टी करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावरून शिवसेना-भाजपमध्ये युतीत वादाची ठिणगी पडली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बागडे यांची बदली होईपर्यंत शिवसेनेला सहकार्य करायचे नाही असा ठराव करण्यात आला , तर त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजिनामा देण्यासाठीही तयार आहे. अशी प्रतिक्रिया दिली होती.
त्यानंतर शिवसेना शिंदे गट व भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. माजी आमदार पवार यांनी यावर तिखट आणि सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी आम्ही सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.