डोंबिवली - सध्या बदलापूर स्टेशनात होम प्लॅटफाँर्मचे काम सुरु असून ह्या प्लॅटफाँर्मची लांबी १५ डब्यांची लोकल उभी रहाण्याएवढी तयार केली जात आहे. बदलापूर प्रमाणेच टिटवाळा स्टेशनातील प्लँटफाँर्म नंबर दोन ह्या होम प्लॅटफाँर्म ची लांबी १५ डब्यांची लोकल उभी रहाण्याएवढी विस्तारीत करावी. त्या मधील प्लॅटफाँर्मची लांबी वाढवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत ह्या मधल्या स्टेशनात १५ डब्यांची लोकल डबल।हॉल्ट पध्दतीने थांबवावी, असे मत रेल्वेच्या अभ्यासकांनी नोंदवले आहे.
सध्याची वाढती गर्दी पाहता रेल्वे लोकल फेऱ्या वाढवू शकत नसेल तर अशी प्रभावी उपाययोजना करायला हवी, त्याची तातडीने अंमलबजावणी करायला हवी असेही मत नोंदवण्यात आले. पूर्वी मस्जिद स्टेशनात दुसऱ्या काँरीडाँरवर प्लॅटफाँर्म नं. ५ -६ अस्तित्वात होते. ह्या दोन प्लॅटफाँर्मची लांबी केवळ ६ डब्यांची लोकल उभी राहू शकेल एवढीच होती. त्याकाळी सर्व लोकल ९ डब्यांच्या होत्या, त्यामुळे मस्जिद स्टेशनात ह्या दुसऱ्या काँरीडाँरवर थांबणाऱ्या लोकल double halt / दुहेरी थांबा पध्दतीने थांबवल्या जात असतं. प्रथम १ ते ६ डबे फलाटाला लागत, मग लोकल तीन डब्यांच्या एवढे अंतर पुढे जाऊन पुन्हा थांबत असे व दुसऱ्या हॉल्टच्या वेळी ४ ते ६ हे डबे फलाटाला लागत. त्यानंतर लोकल पुढच्या प्रवासाला रवाना होत असे. पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते माझगाव यार्ड दरम्यान जादा रेल्वे लाईन तयार करण्यासाठी मस्जिद स्टेशनातील हे प्लॅटफाँर्म नं. ५ - ६ काढून टाकण्यात आले. कल्याणच्या पुढे टिटवाळा, बदलापूरपर्यंत १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या विस्तारीत करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून प्रवासी व प्रवासी संघटना करीत आहेत, त्यावर अभ्यासक आणि उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी त्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना पर्याय सुचवल्याचे सांगण्यात आले.
कल्याण ते टिटवाळा / बदलापूर दरम्यानच्या स्टेशनातील म्हणजे शहाड, आंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ ह्या स्टेशनातील लांबी टप्याटप्याने वाढवावी. परंतु १५ डब्यांच्या लोकलसाठी कल्याण ते टिटवाळा बदलापूर दरम्यानच्या स्टेशनात प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी जागा उपलब्ध नाही, जागा संपादन करण्यात न्यायालयात प्रकरणे आहेत, निधीची टंचाई अशा सबबी रेल्वे प्रशासनाकडून सतत दिल्या जातात. ह्याच्या परिणामी मेन लाईनवर गेल्या अनेक वर्षांपासून धावत असलेल्या १५ डबा लोकलचा कल्याणच्या पुढे विस्तार करता येत नाही व १५ डबा लोकलची संख्याही वाढवता येत नाही. कल्याण ते टिटवाळा / बदलापूर दरम्यान शहाड २, अंबिवली २, विठ्ठलवाडी २, उल्हासनगर २, अंबरनाथ ३ अशा एकूण ११ प्लॅटफॉर्मचा लांबी विस्तार करण्याची गरज आहे. ह्यापैकी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्याठिकाणी प्लॅटफॉर्मचा लांबी विस्तार करावा व ज्याठिकाणी प्लॅटफॉर्मची लांबी विस्तार करणे सध्या शक्य नाही, अशा ठिकाणी लांबी विस्ताराचे काम पूर्ण होईपर्यंत १५ डबा लोकल डबल हॉल्टव्दारे थांबवाव्यात असाही पर्याय असल्याने रेल्वेने तातडीने ही सुविधा सुरू करून लाखो प्रवाशांना दिलासा द्यावा असे सांगण्यात आले.