डोंबिवली : मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात बरसणाऱ्या तुफान पावसाचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच नाही, तर लोकप्रतिनिधींनाही बसला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, बरच झालं आमदार, मंत्री रेल्वे रुळात अडकले, वाहतूक कोंडीत फसले, निदान आता तरी राज्य शासनाला कळेल की समांतर रस्त्याची मनसेची मागणी किती योग्य आहे, होती.
तसेच रेल्वेचे मुंबईसाठी स्वतंत्र बोर्ड असावे जेणेकरून इथले निर्णय इथेच होतील असेही त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनासाठी निघालेले आमदार आणि मंत्रीच ट्रेनमध्ये अडकले. अखेर रेल्वे रुळांवरुन पायी वाट काढत त्यांना पुढचा प्रवास करावा लागत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेवरील आमदार अमोल मिटकरी आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना रेल्वे रुळांवर पायी जावं लागलं.
यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की, आमदार रुळावर आले हे बरं झालं असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. रेल्वे समांतर रस्ता व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मी ही पाठपुरावा करत होतो, मात्र मागणी पूर्ण होताना दिसत नाही. रेल्वेच्या बाजूने एक पर्यायी मार्ग असायला पाहिजे. महाराष्ट्र हे देशातला एक नंबरच राज्य आहॆ, मात्र दरवेळेस वेळेस रेल्वेचा प्रॉब्लेम येत असल्याने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड असायला हवे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
रेल्वे समांतर रस्ता हवा ही मागणी मनसेची असून दिवंगत आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी ते महापौर, आमदार असताना सर्वप्रथम कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता अस्तित्वात आणला, त्याचा वापर सत्ताधार्यांना करता येत नाही हे दुर्दैव आहे म्हणा, आर्थिक विषयावर सगळे अडकले असल्याची टीका त्यांनी केली.