डोंबिवली : मनसेचे खंदे कार्यकर्ते राजेश कदम, माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे; पण तरीही आमदार प्रमोद पाटील हे केडीएमसीत मनसेचा महापौर होईल, असे विधान करत आहेत; परंतु हे दिवास्वप्नवत आहे. अर्थात, स्वप्न कोणीही बघू शकतो; पण ते साकार करण्यासाठी प्रचंड कष्ट सोसावे लागतात, त्यासाठी पक्षपातळीवर खूप काम करावे लागते, याचा अनुभव त्यांना नाही. म्हणून ते असे विधान करत असतील, असे मत शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.म्हात्रे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. आता तो वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे झटत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनीही पक्ष वाढवला. त्यामुळे पक्ष मजबूत उभा आहे. डॉ. शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीत कामाचा खूप झपाटा लावला आहे. पत्रीपूल, कल्याण-शीळचे काँक्रिटीकरण यासारखे महत्त्वाची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. आगामी निवडणुकीनंतरही सेनेचाच महापौर होईल. तूर्तास आ. पाटील यांनी त्यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबवावी, तसेच आधी पक्षाचे दोन आकडी नगरसेवक निवडून आणावेत, तेदेखील त्यांना एक प्रकारे आव्हानच आहे.
सत्ता असूनही शहरांचा झाला बट्ट्याबोळयासंदर्भात आमदार पाटील म्हणाले की, केडीएमसीत २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. तरीही या शहरांचा बट्ट्याबोळ झालेला आहे; पण असे असतानाही केवळ मतदारांना गृहीत धरून पुन्हा सत्तेत येण्याचे त्यांचे मनसुबे असतील, तर त्यांच्या हिमतीला खरंच दाद द्यावी लागेल. आगामी महापालिका निवडणुकीत नागरिक याचे उत्तर नक्कीच देतील, असा विश्वास वाटतो.