मुरलीधर भवार, कल्याण : 'तो' उल्हासनगरच्या लोकमत न्यूज नेटवर्क कामगार रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आणि त्याला अटक झाली. त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात झाली. त्याला सात वर्षांची शिक्षा झाली. शिक्षा भोगून झाल्यावर त्याच्यावर असलेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगल्याने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. कारागृहात गेल्याने कुटुंबाने त्याची साथ सोडली. कारागृहात होतो तेच बरे होते. दोन वेळच्या जेवणासह चहा, नाश्त्याची सोय होती, अशी व्यथा सात वर्षे सात महिने कारागृहात राहून निर्दोष सुटलेल्या जयसिंग भास्कर (६५) यांनी 'लोकमत'कडे मांडली. उल्हासनगरातील टिळकनगरात जयसिंग राहत होते. एका महिलेच्या मुलीला कामाला लावतो, असे आमिष दाखवून जयसिंग यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणी पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून जयसिंग यांना २६ जून २०१६ रोजी अटक केली. जामीन न मिळाल्याने जयसिंग यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. त्यांच्यावर जे आरोप ठेवण्यात आले होते, त्यासाठी सात वर्षे शिक्षेची तरतूद होती. ते न्यायालयीन कोठडीत असतानाच अॅड. गणेश घोलप यांची कारागृहात त्या ंच्याशी ओळख झाली. जयसिंग यांनी घोलप यांना सर्व हकिकत सांगितली आणि या प्रकरणाला कलाटणी मिळाली.
अटकेमुळे निवृत्तीच्या वेतनापासून वंचित
अटक झाल्यामुळे जयसिंग यांना निवृत्तीचे वेतन मिळाले नाही. त्यांचे थकीत आणि सेवानिवृत्तीच्या वेतनासाठी अॅड. घोलप कामगार आयुक्त आणि औद्योगिक न्यायालयात पाठपुरावा करत आहेत. कारागृहातून बाहेर आल्यावर जयसिंग यांना मित्राने आधार दिला आहे. ते दहा रुपयांची शिवभोजन थाळी खाऊन दिवस काढतात.
त्यांचीही झाली निर्दोष मुक्तता...
जयसिंग यांच्याप्रमाणेच विपुल नारकर, शत्रुघ्न चव्हाण, सागर रक्षे, मणिकंडन नाडर, वामन वाघे, सुरेश खाडे आणि सलीम शेख यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. गुन्ह्यातील शिक्षा भोगून झाल्यावर त्यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे. या प्रकरणांमध्येही अॅड. घोलप यांनीच कामकाज पाहिले.
गुन्हा घडलाच नव्हता, वैद्यकीय अहवाल शून्य होता
या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होत नव्हती तर दुसरीकडे जयसिंग यांच्यावरील आरोपानुसार ७ वर्षांची शिक्षा त्यांनी आरोप सिद्ध होण्यापूर्वीच भोगली. या घटनेचा वैद्यकीय अहवाल शून्य होता.
या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश अमोल हरणे यांनी अॅड. घोलप यांची नियुक्ती केली. घोलप यांनी पीडिता, तिची मैत्रीण, साक्षी-पुरावे तपासून सर्व न्यायालयापुढे मांडले.
या घटनेचा वैद्यकीय अहवाल शून्य होता. जयसिंग पीडितेस कधीच भेटले नव्हते. त्यांच्यात बोलणेही झाले नव्हते.
न्यायाधीश हरणे यांच्यासमोर साक्षीपुरावे आल्यानंतर जयसिंगची निर्दोष मुक्तता करण्यात आली.