कल्याण: एकीकडे दुचाकी चोरीचे सत्र सुरू असताना कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग ३ च्या पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्हयात एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. निरज चौरसिया (वय १९) असे अटक आरोपीचे नाव आहे. अंबरनाथमध्ये राहणारा निरज आयटीआयचे प्रशिक्षण घेत असून मौजमजेसाठी त्याने मोटारसायकली चोरल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचा ताबा महात्मा फुले चौक पोलिसांकडे देण्यात आला आहे.
काटई गाव नाका येथे एक अनोळखी व्यक्ती चोरीची मोटारसायकल घेऊन उभा आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार विश्वास माने यांना मिळाली. ही माहीती मिळताच वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार माने, बालाजी शिंदे, विलास कडु, बापुराव जाधव, मिथुन राठोड, गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे आदिंचे पथक घटनास्थळी रवाना झाले. गुप्त बातमीदाराने केलेल्या वर्णनानुसार निरजला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याला पोलिस ठाण्यात आणुन त्याची चौकशी केली असता त्याने संबंधित मोटारसायकल महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची माहीती दिली.
पुढे चौकशीत त्याने आणखीन चार मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी पाच मोटारसायकली असा एकुण १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यासह डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिस ठाण्यात देखील मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहीती तपासात उघड झाली आहे. निरज हा आयटीआय मध्ये प्रशिक्षण घेतो, त्याने मौजमजेसाठी मोटारसायकल चोरीचा मार्ग पत्करल्याची माहिती पोलिसांनी दिली.