सचिन सागरे, कल्याण : ठाणे जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनांनी एकत्र येवून, 'ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघ' हे संस्थेचे नाव निश्चित करीत या महासंघाचे अध्यक्ष म्हणून जगन्नाथ शिंदे यांची सर्वानुमते निवड केली.
ठाणे जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनांची जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सभा रविवारी कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सभागृहात संपन्न झाली. या संयुक्त सभेला आर्चरी, ॲथलेटिक्स, आट्यापाट्या, बॉल बॅडमिंटन, कबड्डी, टेनिक्वाईट, वुशू, हॅन्डबॉल, ज्युदो, फुटबॉल, बॉक्सिंग, जिमनॅस्टिक, रोलबॉल, कुस्तीगीर, टेनिसबॉल क्रिकेट, फेन्सिंग, सॉफ्टबॉल, स्क्वॅश रॅकेट, रायफल शूटिंग, कॅरम, लंगडी, तायक्वांदो, स्केटिंग या एकविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाचे अध्यक्ष या नात्याने शिंदे यांनी खेळाडू विकासाच्या विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऑलिंपिक पदक विजेते तयार झाले पाहिजेत. क्रीडा क्षेत्रात राजकारण आणू नये. ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघाचे कार्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना मार्गदर्शक राहिले पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महासंघ नोंदणीकृत करण्यासाठी श्रीराम पाटील, लक्ष्मण इंगळे, प्रताप पगार, मालोजी भोसले, लिना मॅथ्यू, सुभाष ढोणे, अविनाश ओंबासे यांची सर्वानुमते घटना समितीमध्ये निवड करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन समन्वयक अंकुर आहेर यांनी केले.