मुंबई - कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेभाजपा आणि एमआयएमसोबत राज्यातील सत्तेमधील सहकारी असलेल्या शिवसेनेलाही दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमधील सहा माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला आहे. यात भाजपा, शिवसेना आणि एमआयएमचा प्रत्येकी एक आणि दोन अपक्ष माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तसेच बसपाच्याही एका माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची मुदत वर्षभरापूर्वीच संपली आहे. तसेच येथे यावर्षाच्या अखेरीपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने हे पक्षांतर घडवून आणले आहे. जितेंद्र आव्हाडांच्या पुढाकाराने मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांमध्ये भाजपच्या सुनिता खंडागळे, शिवसेनेच्या उर्मिला गोसावी, एमआयएमच्या तंजविला मौलवी आणि अपक्ष माजी नगरसेवक कुणाल पाटील, फैजल जलाल ( अपक्ष ), रामभाऊ ओव्हाळ ( बसपा) यांचा समावेश आहे. एकाच वेळी सहा माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
या माजी नगरसेवकांसह मनसेचे कल्याण पूर्वेतील युवा संघटक संदीप टावरे, माजी शाखा अध्यक्ष रियाज शेख, युवासेना कल्याण पूर्व संघटक जिवा भोसले, युवा सेना अधिकारी मनोज गायकवाड, समाजवादी पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष शिवसागर यादव , एम आय एम चे ठाणे जिल्हाध्यक्ष आयाज मौलवी आदिंनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, डॉ वंडार पाटील, प्रमोद हिंदूराव, शरद महाजन, रमेश हनुमंते आदिंसह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.