कल्याण, डोंबिवली ते थेट टिटवाळा पर्यंतच्या कल्याण बाह्यवळण या महत्वाकांक्षी प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्यातील एका महत्वापूर्ण भागाच्या कामाला १६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या एमएमआरडीएच्या १५१ व्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या तिसऱ्या टप्प्यात मोठागाव पूल ते गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी ६६१.३६ कोटी रूपयांच्या अंदाजपत्रकीय किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मोठागाव – माणकोली पूल आणि जोडरस्त्याना आवश्यक असलेली रस्ता संलग्नता उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण बाह्यवळण रस्त्याच्या भाग ४ ते ७ ची उपयोगिता वाढणार आहे.
सध्याच्या घडीला मुंबई, ठाणे किंवा नाशिकहून कल्याण डोंबिवलीकडे येजा करण्यासाठी शिळफाटा मार्ग किंवा कोन गाव मार्गे दुर्गाडी पूल असा मोठा वळसा मारावा लागतो. या तिसऱ्या भागातील रस्त्याच्या उभारणीनंतर सुमारे एक तासाची बचत होऊ शकते, अशी माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीचा वेग वाढवण्याच्या प्रकल्पांमध्ये या रस्त्यामुळे आणखी भर पडणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पास २०१४ साली मान्यता देण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मतदारसंघ वाहतूक कोंडीमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. वाहतुक सुकर करणारे अनेक प्रकल्प डॉ. शिंदे यांनी यापूर्वीच मतदारसंघात आणले आहेत. यात मेट्रो, रस्ते मार्गांसाठी कोट्यवधींचे प्रकल्प यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहेत. या कोंडीमुक्त प्रवासासाठी आवश्यक प्रकल्पांमध्ये कल्याण बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यात आला होता. एकूण ३०.५० किलोमीटर लांबी आणि ३० ते ४५ मीटर रूंदी असलेला हा रस्ता बदलापूर - काटई रस्त्यावरील हेदूटणे गावापासून कल्याण शीळ रस्त्यास माणगाव येथे छेदून पुढे मध्य रेल्वेला कोपरजवळ, वसई दिवा रेल्वे मार्गाला गावदेवी ठाकूर्ली येथे छेदून जातो. पुढे दुर्गाडी पुलापासून उल्हास नदीला समांतर हा मार्ग टिटवाळापर्यंत जातो. या रस्त्याचे बांधकाम सात टप्प्यांमध्ये केले जाणार आहे. यातील तिसऱ्या भागातील कामात ५.८६ किलोमीटरच्या रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. यात मोठागाव पूल ते गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या रस्त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याची विनंती प्राधिकरणाला करण्यात आली होती.
त्यानुसार या रस्त्याचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे. या रस्त्याचे काम झाल्यास मोठागाव – माणकोली पूल आणि जोड रस्त्याना आवश्यक असलेली रस्ता संलग्नता उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण बाह्यवळण रस्त्याच्या भाग ४ ते ७ ची उपयोगिता वाढणार आहे. सध्याच्या घडीला मुंबई, ठाणे किंवा नाशिकहून कल्याण डोंबिवलीकडे ये-जा करण्यासाठी शिळफाटा मार्ग किंवा कोन गाव मार्गे दुर्गाडी पूल असा मोठा वळसा मारावा लागतो. या तिसऱ्या भागातील रस्त्याच्या उभारणीनंतर सुमारे एक तासाची बचत होऊ शकते. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीसह आसपासच्या सर्वच प्रवाशांसाठी हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे.
या कामाच्या गतीमान कामासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. या रस्त्याच्या भाग तीनच्या टप्प्याची रक्कम प्रशासकीय मान्यतेपेक्षा अधिक असल्याने या कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मंगळवारी पार पडलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 151 वी बैठकीत मोठागाव पूल ते गोविंदवाडी बायपास या रस्त्याच्या बांधकामासाठी 661.36 कोटींच्या अंदाजपत्रकीय किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यामुळे या कामाला गती मिळणार आहे.
असा होणार प्रकल्प या कामाच्या अंमलबजावणीसाठी आता प्रकल्प सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यानंतर बांधकाम कंत्राटदाराची नेमणूक केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत या रस्त्यासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. तर रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी महाराष्ट्र रेल इंफ्रास्ट्रक्चर डेव्लहेलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फ भुयारी मार्ग बांधले जाणार आहेत. या कल्याण बाह्यवळण रस्त्याच्या भाग तीनच्या बांधकामाची अंदाजित किंमत 661.36 कोटी आहे. असा आहे टप्पा तीनकल्याण बाह्यवळण रस्त्यातील टप्पा तीनची लांबी एकूण 5.86 किलोमीटर आणि रूंदी 45 मीटर इतकी आहे. यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पर्जन जलवाहिन्या, पदपथ, चारपदरी मार्गिका, आवश्यक 9 मोऱ्या, 4 लहान पूल, पथदिवे,दिवा वसई रेल्वेमार्ग ओलांडणारा मार्ग या कामांचा समावेश आहे. या रस्त्यातील भाग चार ते सात या टप्प्यातील सुमारे 16.40 किलोमीटर रस्त्याच्या उभारणीचे काम जागेच्या उपलब्धतेनुसार हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याचे सुमारे75 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.