सचिन सागरे कल्याण : कुऱ्हाडीच्या सहाय्याने ४० वर्षीय व्यक्तीची हत्या करणाऱ्या नारायण नागो पारधी (रा. जांभूळवाडी, ता.मुरबाड) याला कल्याण अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तर, त्याचा भाऊ गोविंदची पुराव्या अभावी मुक्तता केली.
२० जून २०१९ च्या रात्री नारायणच्या घरी भास्कर पारधी (४०) गेला होता. तेथे या दोघांमध्ये झटापट झाली. यावेळी, गोविंदने भास्करला मागून पकडून ठेवले तर नारायणने त्याच्या मांडीवर आणि कमरेवर कुऱ्हाडीने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या भास्करचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भास्करच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून टोकावडे पोलिसांनी नारायण आणि त्याचा भाऊ गोविंद याला अटक करीत तपास सुरु केला.
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांनी पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणात सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कुटे आणि कोर्ट ड्युटी पोलीस हवालदार उमेश मोहंडूळे यांनी त्यांना मदत केली.