Crime News : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या एका मुंबईतल्या तरुणीसोबत कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडला. अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीवर कल्याणमध्ये दोन चोरट्यांनी अॅसिड हल्ला करुन तिचा लॅपटॉप घेऊन पळ काढला. चोरट्यांनी अंगावर टाकलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे तरुणी जखमी झाली असून तिच्या अंगावरचे कपडे जळाले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
कल्याण पूर्वेकडील पार्किंग परिसरात ही घटना घडली असून, आरोपीने तरुणीला एकटी पाहून ज्वलनशील पदार्थ फेकून तिचा लॅपटॉप चोरून नेला. दोन चोरट्यांनी आधी तरूणीवर ज्वलनशील पदार्थ फेकले आणि नंतर तिचा लॅपटॉप लुटला. मुंबईतील अंधेरी भागात राहणारी ही तरुणी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. या घटनेत तरुणी किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी आता तपास सुरु केला आहे.
तरुणी शनिवारी कल्याण येथे राहणाऱ्या आपल्या मित्राला लॅपटॉप देण्यासाठी कल्याणमध्ये आली होती. त्यावेळी कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये तरुणी गेली. तिथे अचानक दोन अज्ञात इसमांनी तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला. हल्ल्यानंतर तरुणीने डोळे मिटले मात्र तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ पडल्याने कपडे थोड्याफार प्रमाणात जळाले. पीडित तरुणीने कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलीस या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण स्टेशनच्या पार्किंग परिसरात आल्यानंतर पुढच्या नाल्याच्या बाजूने तरुणी पुढे जाऊन वळली. त्यानंतर दोन अज्ञात इसमांनी तरुणीच्या अंगावर कास्टिक सोडा फेकला. यामुळे तरुणीच्या अंगाला जळजळ होऊ लागली. ज्वलनशील पदार्थामुळे तिची ओढणी आणि ड्रेस जळाला.यामुळे तिच्या डोळ्यांसमोर अंधारी देखील आली. त्यानंतर आरोपींनी तिची लॅपटॉपची बॅग हिसकावून घेतली आणि तिथून पोबारा केला.