कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी आणि कार्याध्यक्षपदी नव्याने नियुक्त्या झाल्याने लवकरच नवीन कार्यकारिणीची स्थापन केली जाणार आहे. केडीएमसीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी नेमताना कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. त्यानुसार चाचपणी सुरू झाली असून, पक्षांतर्गत वादाचीही दखल घेतली जाणार आहे.
केडीएमसीची निवडणूक कोरोनावर अवलंबून आहे. परंतु, त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडी की स्वबळ, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर प्रलंबित असताना स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू आहे. महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले. त्यानंतरही संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर पक्षाची चार वर्षांत फारशी उजवी कामगिरी झालेली नाही.
दरम्यान, आता जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार व ज्येष्ठ नेते जगन्नाथ (अप्पा) शिंदे आणि कार्याध्यक्षपदाची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. वंडार पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या बदलामुळे जुनी कार्यकारिणी बरखास्त झाली असून, लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.