- मुरलीधर भवार कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चमध्ये सुरू झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये परराज्यातील बांधकाम कामगार व मजूर आपल्या गावी परतले. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यवसायाला बसला. लॉकडाऊननंतर लगेचच रेती, सिमेंट आणि स्टीलचे भाव वाढले. त्यामुळे घरांचे बांधकाम महागले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या बांधकाम व्यवसायाला साहित्य दरवाढीचा फटका बसला आहे. कल्याण-डोंबिवलीत जवळपास १५० पेक्षा जास्त नवीन गृहसंकुलांचे प्रकल्प सुरू होते. या प्रकल्पांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. याबाबत एमसीएचआय या बिल्डरांच्या संघटनेचे माजी अध्यक्ष रवी पाटील म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१७ मध्ये नोटाबंदीची घोषणा केली. त्याचा फटका बांधकाम व्यवयासाला बसला. त्यानंतर जागतिक मंदी आली. त्यातही व्यावसायिक तग धरून होता. मात्र, २०१९ ला पावसाने झोडपले होते. अतिवृष्टीचा व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यातून कुठे व्यावसायिक सावरत नाहीत तोच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कल्याण-डोंबिवली परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत व्यावसायिक अनलॉकमध्ये कुठे श्वास घेण्याचा प्रयत्न करीत असताना आता बांधकाम साहित्याच्या दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. तर, दुसरीकडे राज्य सरकारने वाळू व्यवसायाचा लिलाव बंद ठेवला आहे. त्यामुळे राज्यात वाळूचा तुटवडा आहे. आता बांधकामासाठी येत असलेली रेती ही गुजरातमधून येत आहे. त्यामुळे तिचा भाव जास्त आहे.’
मार्चनंतर कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सगळ्याच उद्योग-व्यवसायांना बसला. कोरोनामुळे परप्रांतीय व आंतरराज्यातील मजूर हे त्यांच्या गावी परतले. त्यामुळे सिमेंट, स्टील आणि रेती वाहून नेणारे मजूर नसल्याने बांधकाम साहित्याचे दर वाढले.- राकेश सोमानी, बांधकाम साहित्य विक्रेते
बांधकाम साहित्याचे दर का वाढले?कोरोनामुळे देशभर लागू झालेल्या लोकडाऊनमुळे सर्वत्र बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर जूननंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू झाले. मात्र, बंद असलेली सर्वच बांधकामे एकाचवेळी सुरू झाली. त्यामुळे बांधकाम साहित्यापासून ते मजुरांपर्यंत सर्वांचीच मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाली. त्यातच बांधकाम साहित्याचे भाव वाढले,